

अंकली : सर्व्हरच्या समस्येमुळे शिधापत्रिकेवरील धान्य वितरणात अडथळे निर्माण झाले आहेत. स्वस्त धान्य दुकाने आणि शिधापत्रिकाधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चार-पाच दिवसांपासून सर्व्हरची समस्या अधिक गंभीर बनली असून, बोटांचे ठसे घेणेही शक्य होत नसल्याची परिस्थिती आहे. राज्यभरात केवळ सुमारे ५० टक्के शिधावाटप झाले असून उर्वरित ५० टक्के धान्य वितरण २ दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
प्रत्येक महिन्याला सर्व्हरच्या समस्येमुळे धान्य वितरणामध्ये अडचणी येत असल्याने राज्य सरकारी वितरक कल्याण विकास संघटनेने सरकारला कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. सर्व्हरच्या समस्येमुळे राज्यातील सुमारे २२ हजार स्वस्त भाव दुकानांमधून अन्नभाग्य योजनेतील तांदळाच्या वितरणात अडथळे निर्माण होत आहेत.
केंद्राच्या 'प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना' आणि राज्याच्या 'अन्नभाग्य' योजनेंतर्गत दरमहा स्वस्त धान्य दुकानांतून अन्नधान्याचे वितरण केले जाते. दोन्ही योजनांनुसार बीपीएल शिधापत्रकधारकांना धान्य वितरित केले जाते. त्यासाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे अनिवार्य असल्याने सर्व्हरच्या समस्येमुळे वितरण प्रक्रिया विस्कळीत झाली आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसह अनेक शिधापत्रकधारकांना तांदळाचा वाटा मिळवण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत स्वस्त धान्य दुकानांसमोर रांगेत उभे रहावे लागत आहे. रोजची कामे बाजूला ठेवून प्रतीक्षा करावी लागत असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. सर्व्हरच्या अडचणीमुळे दिवसभरात केवळ ७ ते ८ जणांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण होत असल्याने अनेकांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे. सदर समस्या निकालात काढून धान्य वितरण सुरळीत करण्याची मागणी होत आहे.