

बेळगाव : केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढ केल्यानंतर बेळगाव सराफ बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किंमतींनी नवा उच्चांक गाठला आहे. बेळगावात सोन्याच्या दरात तब्बल १३ हजार रुपयांची वाढ झाली आहे. लग्नसराईच्या हंगामातच अनपेक्षित वाढ झाल्याने सोने-चांदी खरेदीचे स्वप्न कसे साकार करायचे, या विवंचनेत ग्राहक आहेत. सोन्या- चांदीच्या उसळीमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडले असून याचा सराफ बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम झाला आहे.
सोन्यावरील आयात शुल्कात आता १० टक्के मूलभूत सीमा शुल्क आणि ५ टक्के कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर लागू केल्याने सोने-चांदी भाव वाढले आहेत. बेळगावमधील सराफ बाजारात सोने दर प्रति दहा ग्रॅम १ लाख ६८ हजारांवर तर चांदी प्रति किलो २ लाख ९९ हजार रुपयांवर पोहोचली आहे.
बेळगाव ही उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरील सोन्याची मोठी बाजारपेठ मानली जाते. लग्नसराईसाठी गोवा, चंदगड आणि कोकणातूनही ग्राहक येतात. मात्र, सोने -चांदी दरात पुन्हा मोठी वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. ज्यांनी आगाऊ नोंदणी केली नव्हती, अशा ग्राहकांना आता तोळ्यामागे १३ ते १५ हजार रुपये जादा मोजावे लागत आहेत. चांदीच्याही दराने उसळी घेतल्याने पूजेची भांडी आणि भेटवस्तू खरेदी करणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे.
जुन्याचे नवे
सोन्या-चांदीच्या वाढीव दरामुळे ग्राहक आता खरेदी करावी की दर उतरण्याची वाट पाहावी, अशा मानसिकतेत दिसत आहेत. नवीन दागिने घेण्याऐवजी घरातील जुने सोने मोडून तेच पॉलिश करून वापरण्याकडेही कल वाढला आहे. मुख्य सोहळ्यासाठी खऱ्या सोन्याऐवजी 'वन ग्रॅम' किंवा 'इमिटेशन ज्वेलरी' घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणारे गुंतवणूकदार आता या उच्च दरामुळे खरेदी करण्यास धजावत नाहीत.
सोन्याला मोठी मागणी असली तरी देशांतर्गत सोन्याचे उत्पादन अत्यंत मर्यादित आहे. सध्या भारतात वर्षाला साधारण १.६ ते २ टन इतकेच सोन्याचे उत्पादन होते. यामुळे देशाला आपल्या एकूण गरजेच्या ९०% पेक्षा जास्त सोने स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिराती आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांतून आयात करावे लागते. वाढती मागणी आणि मर्यादित उत्पादन यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि परकीय चलन साठ्यावर मोठा ताण येतो.
दरवाढीमुळे केवळ ग्राहकच नव्हे, तर सुवर्ण कारागीरही चिंतेत आहेत. मागणी घटल्यामुळे दागिन्यांच्या घडणावळीचे काम कमी झाले आहे. केंद्र सरकारने परकीय चलन वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला असला, तरी ऐन लग्नसराईत घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. बेळगावच्या सराफ व्यापार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर हे दर असेच राहिले, तर या हंगामात उलाढाल ४० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला आहे. सोन्याची ही 'चमक' आता सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरत आहे. 'सोनेरी' स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता लग्नाचे बजेट सांभाळताना मोठी कसरत करावी लागणार आहे.