

बेळगाव : बेळगाव तालुक्यासह अन्य ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून २४ लाख रुपये किंमतीचे १६ तोळे सोन्याचे दागिने व अडीच लाख रुपयांच्या एक किलो चांदीच्या वस्तूंसह अन्य मुद्देमाल जप्त केला. रोहन रुपेश पाटील (वय ३०, मूळ रा. क्रांतीनगर, गणेशपूर, सध्या रा. श्रीहरी अपार्टमेंट, दुसरे रेल्वे फाटक, टिळकवाडी) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लक्ष्मी सिद्राम रामण्णावर (रा. स्वामी विवेकानंदनगर हुंचेनट्टी) यांनी २ ऑक्टोबर रोजी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांचे घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने व अन्य वस्तू चोरुन नेल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले होते. याच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरु होता. गस्तीवर असताना पोलिसांनी रोहनला संशयावरुन ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने हुंचेनट्टीच्या चोरीची कबुली दिली. कसून चौकशीत त्याने सहा ठिकाणी घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले.
हुंचेनट्टीसह मच्छे, पिरनवाडी व अन्य ठिकाणी त्याने घरे फोडल्याचे तपासात समोर आले. त्याला अटक करुन त्याच्याकडून १६१ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, एक किलो चांदीच्या वस्तू, चोरीसाठी वापरलेली दुचाकी, लोखंडी रॉड, कटर, स्क्रू-ड्राईव्हर, पाने असे साहित्य जप्त केले.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वडगावचे निरीक्षक नागनगौडर कट्टीमनीगौडर, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी, संतोष दळवाई, वाय. डी. सरनाईक व सहकारी सतीश नायकवडी, श्रीकांत उप्पार, मारुती कोटबागी, बाळेश पडनाड, आनंद कोटगी, शिवानंद वर्चगल्ल, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशीद, दीपक दोड्डगोणी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.