

बेळगाव : रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने पळविणारी टोळी शहर परिसरात पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. माळमारुती परिसरात एका महिलेचे दिड तोळ्याचे तर दुसऱ्या घटनेत काकती येथील देसाई गल्लीत महिलेचे अंदाजे तीन ते चार तोळ्यांचे दागिने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पळवून नेले.
माळमारुती परिसरातील श्रीनगर गार्डन परिसरात राहणारी महिला गुरूवारी सायंकाळी साई मंदिराला गेली होती. तिकडून घरी परतत असताना रात्री आठच्या सुमारास संगोळ्ळी रायण्णा कॉलेजजवळ पाठीमागून दुचाकीवरून दोघे चोरटे आले. त्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिन्याला हिसडा मारून दिड तोळ्यांचे दागिने हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड केली. तत्पूर्वीच दोघेही भामटे दुचाकीवरून भरधाव निघून गेले.
माळमारुती परिसरात घटना घडताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महिलेला ठाण्यात बोलावून फिर्याद घेणे सुरू असतानाच अवघ्या तासाच्या आत काकती येथेही अशीच घटना घडली. तेथील जोशी नामक महिला भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेली असताना पाठीमागून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील दागिन्याला हिसडा मारत ते पळवून नेले.
महिलेने आरडाओरड करेपर्यंत दोघेही भामटे दुचाकीवरून पसार झाले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही घटनांची नोंद झाली नव्हती. त्यामुळे चोरीला गेलेल्या दागिन्यांची नेमकी माहिती मिळू शकली नाही. परंतु, हे दागिने अंदाजे पाच तोळ्यांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन्ही घटनांमध्ये साधर्म्य
एकाच वेळी दोन घटना घडल्याने पोलिसांनी या घटनेची माहिती घेतली असता दोन्ही प्रकरणातील संशयित एकच असल्याचा संशय आहे. त्यांची दागिने पळविण्याची मोडस ऑपरेंडी एकच असल्याने पोलिसांनी तातडीने तपासाला गती दिली आहे. दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मिळते का, याची चाचपणी करण्यात येत होती.