

खानापूर : पुढारी वृत्तसेवा : लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिल्याने तयारीला वेग आला आहे. कपडे, पूजा सामग्रीच्या खरेदीसाठी ग्रामीण भागातून जथ्थेच्या जथ्थे शहरात दाखल होत आहेत. तथापि खानापूर शहरातील मुख्य बाजारपेठेच्या शिवस्मारक चौकात पोलिसांकडून (Khanapur Police) आज (दि. ६) सकाळपासून वाहन परवाना व कागदपत्रांची तपासणी करून दंडात्मक कारवाई केली जात असल्याने वाहन चालकांची डोकेदुखी वाढली आहे.
वाढत्या रहदारीची समस्या ओळखून गेल्या दोन दिवसांपासून शिवस्मारक चौकातून बाजारपेठेत चार चाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असला तरी दुचाकी वाहनांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे बहुतेक जण खरेदीसाठी दुचाकींचाच वापर करत आहेत. हीच संधी साधून पोलिसांकडून दंड वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्याचा हंगाम साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. हेल्मेट, वाहन परवाना, नंबर प्लेट या कारणांवरून दंड आकारणी सुरू आहे. आधीच शहराबाहेरील करंबळ क्रॉस, पारिश्वाड क्रॉस, मराठा मंडळ पदवी महाविद्यालय या ठिकाणी सुरू असलेल्या दंड वसुलीमुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असताना आता गर्दीच्या ठिकाणी हेल्मेटची अपेक्षा करत सुरू असलेली दंडात्मक कारवाई (Khanapur Police) नाराजीचा विषय ठरली आहे.
शहरांतर्गत महामार्ग आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या बाबतीत कसलीच कृती होत नसल्याने अपघातात तरुणांचे जीव जात आहेत. शहर आणि परिसरातील खड्डेमय रस्त्यांमुळे अपघात आणि रहदारीची समस्या खानापूरकरांच्या अंगवळणी पडली आहे. त्यात आता ऐन उत्सवाच्या काळात पोलिसांच्या कारवाईला जोर आल्याने सर्वसामान्य नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.