Belgaum Ganesh Visarjan : श्री विसर्जन तिसऱ्या दिवसापर्यंत

भक्तांच्या उत्साहाला उधाण : शनिवारी रात्री १२ नंतरही गणरायाला निरोप
Belgaum Ganesh Visarjan : श्री विसर्जन तिसऱ्या दिवसापर्यंत
Published on: 
Updated on: 

बेळगाव : शिगेला पोहोचलेला गणेशभक्तांचा उत्साह, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, पारंपरिक वाद्यांचा गजर तसेच पुढच्या वर्षी लवकर या... अशी साद घालत जल्लोषी, पण तितक्याच भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला शुक्रवारी, शनिवारी निरोप देण्यात आला.

विसर्जन मिरवणूक शनिवारी रात्री १२ नंतरही सुरू होती. त्यामुळे विसर्जन तिसऱ्या दिवसापर्यंत लांबले असून, शेवटचा गणपती पहाटेपर्यंत विसर्जित होण्याची शक्यता होती. महापालिकेचा गणपती शेवटी विसर्जित करण्याचे नियोजन होते. शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता पहिल्या श्रीमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर शनिवारी रात्री १२.३० वा. तब्‍बल ३२ तास उलटले तरी विसर्जन सुरूच होते.

हुतात्मा चौक येथे संयुक्त महाराष्ट्र चौक मंडळाच्या मानाच्या श्रीमूर्तीची पूजा व आरती करून शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी माळी गल्ली सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्रीमूर्तीचे दुपारी ३.३० वाजता सर्वप्रथम विसर्जन करण्यात आले. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ होऊन शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्रीमूर्तीचे कपिलेश्वर तलावात विसर्जन करण्यात आले. सायंकाळी विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर सार्वजनिक मंडळांच्या एकेक श्रीमूर्ती दाखल होऊ लागल्या. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर आणि डीजेचीही साथ असल्याने तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते.

भक्तांची गर्दी

शुक्रवारी रात्री विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भक्तांची गर्दी झाली होती. शहराबाहेर बॅरिकेड्‌स लावून वाहनांना मिरवणूक मार्गाकडे येण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे वाहने दूरवर थांबवून भाविकांनी चालत येत श्रीमूर्ती पाहण्याचा आनंद घेतला. यंदे खूट येथे प्रेक्षा गॅलरीत बसून विसर्जन मिरवणुकीचा आनंद भक्तांनी घेतला. मिरवणूक मार्गावर शहरासह परगावच्या गणेशभक्तांची मोठी गर्दी होती. यात महाराष्ट्रासह गोव्यातील गणेशभक्तांचाही सहभाग होता. कपिलेश्‍वर उड्डाणपुलावर श्रीमूर्ती रांगेत थांबवण्‍यात आल्या होत्‍या. एकाच वेळी अनेक मंडळांच्‍या श्रीमूर्ती विसर्जनासाठी आल्‍याने मिरवणूक मार्गावर गर्दी वाढली. गणेशभक्तांचा उत्साह आणि संथगतीने येणार्‍या श्रीमूर्ती यामुळे विसर्जन प्रक्रिया मंदावली होती. शनिवारी दुपारी पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांनी विसर्जन तलावाची पाहणी करून गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिसांना सूचना दिल्या. सायंकाळी ४ नंतर विसर्जन तलावावर गर्दी झाल्यानंतर नियोजन करताना स्वयंसेवकांना कसरत करावी लागली.

महामंडळाचे लक्ष

मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही विसर्जन व्यवस्थेवर लक्ष ठेवले होते. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात होता. जलद कृती दलाचे जवानही लक्ष ठेवून होते.

विसर्जनाला उच्चांकी वेळ

यंदा विसर्जन मिरवणूक उच्चांकी वेळ चालण्याचा अंदाज आहे. श्रीमूर्ती विसर्जनस्थळी आल्यानंतर आरती करून क्रेन लावली जात होती. प्रशासन व महामंडळाने दक्षता घेऊनही विसर्जन प्रक्रिया संथगतीने सुरू राहिली. शनिवारी सायंकाळी ५ नंतर श्रीमूर्ती विसर्जनासाठी दीड ते दोन तास अवधी लागत होता.

रात्री ११ पर्यंत २२० मूर्तींचे विसर्जन

शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत कपिलेश्वर आणि कपिलतीर्थ या दोन तलावांत १३० श्रीमूर्तींचे विसर्जन झाले होते. तर रात्री ११ पर्यंत २२० गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. जक्कीनहोंड तलावात ५५ सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन झाले होते. कपिलेश्र्वरावर सुमारे २० मूर्ती अजून रांगेत होत्या. कपिलेश्र्वरवरील दोन्ही तलावांवर पाच क्रेन सेवेत होत्या. विसर्जन सुरू असताना दुर्घटना घडू नये, यासाठी लाईफ गार्ड आणि जलतरणपटू तैनात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news