Belgaum Ganesh Festival: ट्रान्‍स्‍फॉर्मरजवळच मंडपाची उभारणी

हेस्‍कॉमच्‍या सूचनांकडे दुर्लक्ष : दुर्घटनेचा धोका, सुरक्षेला प्राधान्‍य देण्‍याची गरज
Belgaum Ganesh Festival
बेळगाव : पापामळा येथे ट्रान्‍स्‍फॉर्मरला लागूनच उभारण्‍यात आलेले लोखंडी खांब.Pudhari
Published on
Updated on

बेळगाव : गणेशोत्सव आठ दिवसांवर आल्याने शहरात उत्साहाचे वातावरण असून, सार्वजनिक गणेश मंडळांकडून मंडप उभारणीची लगबग सुरू झाली आहे. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, विद्युत रोषणाई आणि देखाव्याच्या तयारीला वेग आला असतानाच काही मंडळांकडून सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. ट्रान्‍स्‍फॉर्मरपासून किमान दोन मीटर अंतर राखून मंडप उभारण्याच्या हेस्कॉमच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून दोन मंडळांनी ट्रान्‍स्‍फॉर्मरला लागूनच मंडप उभारले आहेत. त्यामुळे दुर्घटना घडण्‍याचा धोका निर्माण झाला आहे.

पापाचा मळा आणि काळी आमराई या ठिकाणी गणेश मंडळांनी ट्रान्‍स्‍फॉर्मरपासून अवघे दोन फुटांचे अंतर ठेवून मंडप उभारल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉमकडून मंडळांना यापूर्वीच सुरक्षेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ट्रान्‍स्‍फॉर्मर, वीजखांब आणि वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवून मंडप उभारावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही संबंधित मंडळांनी याकडे दुर्लक्ष केल्‍याने हेस्कॉमची चिंता वाढली आहे.

पावसाची शक्यता लक्षात घेता ट्रान्‍स्‍फॉर्मरच्या अगदी जवळ मंडप उभारणे धोकादायक ठरू शकते. मंडपाचे कापड, लोखंडी खांब किंवा इतर साहित्य विद्युत उपकरणांच्या संपर्कात आल्यास गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यातच पावसामुळे परिसरात ओलावा निर्माण झाल्यास विद्युत प्रवाहाचा धोका आणखी वाढू शकतो. गणेशोत्सव काळात मंडपांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. त्यामुळे विद्युत भार वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत ट्रान्‍स्‍फॉर्मरजवळ मंडप उभारल्यास मंडळातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

नियम पाळले नाहीत तर वीज जोडणी बंद

हेस्कॉमने सूचना करूनही संबंधित मंडळांनी त्याची अंमलबजावणी केली नसल्याने आता या दोन्ही मंडळांना वीज जोडणी द्यावी की नाही, याबाबत हेस्कॉम विचार करत आहे. सुरक्षेच्या नियमांचे पालन न करता मंडप उभारलेल्या ठिकाणी वीज जोडणी दिल्यास भविष्यात काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news