Belgaum Murder Case : मित्राचा खून; तिघांना जन्मठेप

सहा वर्षांत निकाल
Murder
MurderPudhari
Published on: 
Updated on: 

बेळगाव : पैसे आणि दागिन्यांच्या लालसेतून मित्राची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी तीन मित्रांना तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सत्यजित ऊर्फ सतीश शहाजी क्षीरसागर (वय २६), सौरभ अजित अथणी (वय २६) आणि रवी इरन्ना शिरगावी (वय २७, सर्व रा. निपाणी) अशी गुन्हेगारांची नावे आहेत. अरविंद गौरीशंकर पोळ असे मृताचे नाव आहे. २०१९ मध्ये पांगिरे गावात तिघांपैकी एका गुन्हेगाराच्या आजीच्या घरात हत्या करण्यात आली होती.

आरोपपत्रानुसार, अरविंद आणि तिन्ही तरुणांची सहा वर्षांपासून ओळख होती. अरविंदकडील पैसे आणि सोन्याचे दागिने मिळविण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्याच्या हत्येचा कट रचला. २९ मार्च २०१९ रोजी कट रचून ३१ मार्च २०१९ रोजी सत्यजितच्या पांगिरे येथील आजीच्या घरी अरविंदला बोलावून घेण्यात आले. त्यानंतर हे सर्वजण दारू पित बसले. त्यानंतर अचानक सौरभने अरविंदच्या डोक्यावर हातोड्याने वार केला. यामुळे अरविंद जमिनीवर कोसळला. त्यानंतर पुन्हा सत्यजितने हातोड्याने अरविंदच्या डोक्यावर दहा ते बारा वेळा प्रहार केले. यात अरविंदचा मृत्यू झाला.

घटना उघडकीस आल्यानंतर निपाणी परिसरात खळबळ उडाली होती. बसवेश्वर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी संशयितांना अटक केली होती. सर्वांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, २०१, ३४ आणि १२०(ब) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. न्यायालयात साक्षी, पुरावे, मुद्देमाल अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार जन्मठेप आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १२० (ब) अन्वये प्रत्येकी एकूण १ लाख ६० हजार रुपये दंड ठोठावला आहे. ॲड. आर. जी. देवरड्डी यांनी न्यायालयात सरकारच्या वतीने बाजू मांडली.

अंगठ्या, गळ्यातील सोन्याची साखळी काढली

आरोपींनी त्यानंतर अरविंदच्या खिशातील पैसे, सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यातील सोन्याची साखळी काढून घेतली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने तिसरा आरोपी रवी शिरगावीला बोलावून वाहनाची व्यवस्था केली. मृतदेहासह रक्ताचे डाग असलेले कपडे, चटई, बिअरची बाटली आणि अन्य पुरावे हटविण्याचा प्रयत्न केला. मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news