

बेळगाव : रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कारने अचानक पेट घेतल्याने काही काळ गोंधळ उडाला. शहरातील गजबजलेल्या फोर्ट रोडवरील जाधव पेट्रोल पंपानजीक मंगळवारी (दि. १३) सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. कारमधील वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज आहे. सुदैवाने कारमधील व्यक्ती वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही.
कारला आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले. गजबजलेल्या रस्त्यावर अचानक कारने पेट घेतल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.