

बेळगाव : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिष दाखवून बेळगावच्या तरुणाकडून मुंबईच्या महिलेने तब्बल 41 लाख गुंतवून घेतले. परंतु, ही रक्कम सदर महिला परत देत नसल्याने या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. महेश शंकर नाडगौड (वय 42, मूळ रा. जोशी गल्ली यमकनमर्डी, सध्या रा. भाग्यनगर पहिला क्रॉस अनगोळ) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी वृंदा प्राची काळे (रा. मुंबई व कोईमतूर) या महिलेविरोधात टिळकवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 19 ते 23 मार्च रोजी घडली असून त्याची शनिवारी पोलिसांत नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महेश याची वृंदा काळे या महिलेची ओळख झाली होती. तिने फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचे आम्हीच दाखवत महेशकडून तब्बल 40 लाख 76 हजार रुपये वेगवेगळ्या प्रकारे घेतले होते. परंतु नफा तसेच मूळ मुद्दलही परत देण्यास ती टाळाटाळ करत होती. यामुळे महेश गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता. त्यामुळे त्याने वृंदा हिला मोबाईलवर इंग्रजीमध्ये संदेश पाठवला. तू माझे जीवन संपवलीस, मी आत्महत्या करणार असून तुझ्या नावाने पत्र लिहीत आहे. तुझ्यामुळेच मी माझे जीवन संपवत असून हे सर्व फक्त तुझ्यामुळे घडले आहे. असा व्हॉट्सॲप संदेश पाठवून त्याने 19 ते 23 मार्च दरम्यान भाग्यनगर अनगोळ येथील सिद्धकला अपार्टमेंटमध्ये घराच्या हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी मृताचा भाऊ उमेश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टिळकवाडी पोलिसात वृंदा काळे या महिलेविरोधात शनिवारी, दि. ४ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक परशुराम पुजेरी पुढील तपास करीत आहेत.