

चिकोडी : यात्रेत वाटण्यात आलेला महाप्रसाद खाल्ल्याने १०० हून अधिक भाविक अत्यवस्थ झाल्याची घटना चिकोडी तालुक्यातील जोडट्टी गावात घडली आहे. जोडट्टी गावातील शल्लेव्वा देवी मंदिरात नुकताच यात्रा महोत्सव पार पडला. यात्रेनिमित्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. जोडट्टीसह परिसरातील शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता.
मंगळवारी रात्री हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही भाविकांना अत्यवस्थ वाटू लागले. उलट्या आणि जुलाब सुरू झाल्याने अनेक भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण १०७ भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अत्यवस्थ झालेल्या बहुतांश भाविकांना तातडीने कब्बूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेतलेले ७१ भाविक बरे होऊन घरी परतले आहेत. प्रकृती गंभीर असलेल्या दोघा रुग्णांना पुढील उपचारासाठी चिकोडी तालुका रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या कब्बूर रुग्णालयात ३३ भाविकांवर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच चिकोडी तालुका आरोग्याधिकारी सुनील खनदाळे यांच्यासह पोलिस आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. महाप्रसाद तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य किंवा स्वच्छतेचा अभाव या घटनेला कारणीभूत आहे का, याबाबत तपास सुरू आहे.