

बेळगुंदी : शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर मधमाश्यांनी अचानक केलेल्या प्राणघातक हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. अजित वासुदेव गावडा (पाटील) (वय ६१, रा. भडांगे कॉलनी, बेळगुंदी) असे त्यांचे नाव आहे. बेळगुंदी-सोनोली सीमेवर सोनोलीच्या शेतात ही दुर्घटना घडली.
अधिक माहिती अशी, अजित पाटील सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील पिकांना पाणी सोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी घराच्या दिशेने धाव घेतली. मात्र, मधमाश्यांच्या दंशाने असह्य वेदना झाल्यामुळे ते वाटेतच बेशुद्ध होऊन कोसळले.
काही वेळानंतर हा प्रकार शेजारील एका शेतकऱ्याच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ गावात माहिती दिली. ग्रामस्थांनी धाव घेऊन अजित यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. वडगाव पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे. शल्यचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पार्थिवावर सायंकाळी साडेचारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले..