Belgaum News: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मशागतीच्या कामांना वेग

ऊस भरणीसाठीही शेतकऱ्यांची लगबग
Kharif Season
Kharif Season
Published on
Updated on

कारदगा : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने कारदगासहेब ढोणेवाडी, भोज, मांगूर परिसरातील शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. पेरणीपूर्व मशागत, शेणखत टाकणे, सऱ्या सोडणे तसेच ऊस भरणीची कामे वेगाने सुरू असल्याचे चित्र परिसरातील शिवारात दिसून येत आहे.

पेरणीसाठी शेतकरीवर्ग शेतीची नांगरट, शेणखताची वाहतूक, सऱ्या सोडणे आदी कामांमध्ये गुंतला आहे. त्याचबरोबर रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशकांची जुळवाजुळव करून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळ्यात ऊस भरणीच्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अनेक शेतकरी पावसाळ्यापूर्वीच ट्रॅक्टर व बैलजोडीच्या सहाय्याने ऊस भरणी करून घेत आहेत.

बैलजोड्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने बहुतांश शेतकरी यांत्रिक साधनांचा वापर करून चार ते साडेचार फुटी सऱ्या सोडत विविध पिकांची लागवड करीत आहेत. वाढत्या महागाईमुळे खते, बियाणे, कीटकनाशके तसेच मशागतीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना मोठी आर्थिक तजवीज करावी लागत आहे. गावागावांत बैलजोड्यांची संख्या कमी झाल्याने उपलब्ध बैलधारकांवर शेतीकामांचा अतिरिक्त ताण पडत आहे.

वळीव पावसाने अद्याप हुलकावणी दिल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. हेस्कॉमकडून होणारा अनियमित व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा ऊस पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारदगासह ढोणेवाडी, बारवाड, मांगूर, भोज, माणकापूर, कसनाळ, जंगमवाडी, बोरगाववाडी, जनवाड व चांदशिरवाड आदी भागांमध्ये शेती मशागतीसह ऊस भरणीच्या कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news