Belgaum Chain Snatching : तोतया पोलिस, चेन स्नॅचर्स शिरजोर

दोन महिलांचे बारा तोळ्यांचे दागिने पळवले : नानावाडी, बसव कॉलनीतील घटना
Chain Snatching
Chain Snatching(AI Photo)
Published on
Updated on

बेळगाव : पंधरवड्यापूर्वी डोके वर काढलेल्या चेनस्नॅचर्सनी पुन्हा शहरात दहशत पसरवलेली आहे. यातच भर तोतया पोलिसांची पडली असून एकट्या महिलांचे लक्ष विचलित करून लुटण्याचे व दागिने हिसकावण्याचे प्रकार सुरूच आहेत. पोलिस असल्याचे भासवून एपीएमसी ठाणा हद्दीतील बसव कॉलनीतील महिलेचे ७ तोळ्यांचे दागिने लांबवण्यात आले. नानावाडी येथे महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळ्यांचे मंगळसूत्र दोघा चेनस्नॅचर्सनी पळवून नेले.

बेळगाव शहर परिसरात गुरूवारी व शुक्रवारी सलग दोन दिवस घडलेल्या दोन घटनांमुळे खळबळ उडाली आहे. बॉक्साईट रोडवरील बसव कॉलनी येथे राहणाऱ्या दंगम्मा पी. एल. या गुरूवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास सेंट जोसेफ चर्चला निघाल्या होत्या. बसव कॉलनीतून बाहेर पडून रस्त्यावर आल्यानंतर तोंडावर मास्क व डोक्यावर हेल्मेट घातलेला तीशीतील एक तरुण त्यांच्याजवळ आला. आपण पोलीस असून पुढे खून झाल्याने बंदोबस्त ठेवला आहे. तुम्ही असे दागिने घालून फिरू नका, ते रूमालात बांधून देतो, असे त्याने सांगितले.

दंगम्मा आधी दागिने काढून देत नव्हती. मात्र आणखी एक व्यक्ती दुचाकीवरून येथे आली. काय झाले आहे, अशी विचारणा त्याने समोरच्या व्यक्तीला केली. त्याने त्यालाही पुढे खून झाला आहे, दागिने काढून खिशात ठेवा, असे म्हणताच समोरच्या व्यक्तीने आपल्या गळ्यातील सोनसाखळी काढून या तोतया पोलिसाच्या हातात दिली व ती बांधून घेऊन गेल्याचे नाटक केले.

त्यामुळे हे सर्व खरे आहे, असे समजून सदर महिलेनेही आपल्या तीन तोळ्यांच्या बांगड्या व चार तोळ्यांची सोनसाखळी काढून बांधून देण्यासाठी भामट्याच्या हाती दिली. ती घेतल्यानंतर बांधून देण्याच्या बहाण्याने त्याने पळ काढला. सोनसाखळी काढून देणारा तो दाढीधारी व्यक्ती व हा तोतया पोलीस हे एकमेकांचे साथीदार असल्याचे नंतर स्पष्ट झाले. आपण फसलो गेल्याचे लक्षात येताच महिलेने एपीएमसी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दोन लाखांचे दागिने गेल्याची नोंद करून घेतली असली तरी या महिलेचे सध्याच्या बाजारभावानुसार दहा लाखांचे दागिने चोरीला गेल्याने या कुटुंबाला धसका बसला आहे.

मंगळसूत्र लांबवले

मंदिराला दर्शनासाठी जाताना एका महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळ्यांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पळवून नेले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नानावाडी रोडवरील मिलिटरी महालक्ष्मी मंदिराजवळ घडली. या प्रकरणी श्रीमती शैला सिद्धारूढ बिरादार-पाटील (वय ३८, रा. ए. विंग दुसरा मजला कृपा अपार्टमेंट, नानावाडी) यांनी कॅम्प पोलिसांत फिर्याद दिली आहे. श्रीमती शैला या मिलिटरी लक्ष्मी मंदिराला दर्शनासाठी निघाल्या होत्या.

यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकजण त्यांच्याजवळ गेला व गळ्यातील मंगळसुत्राला हिसडा मारून ते पळवून नेले. बाहेर दुसरा भामटा थांबला होता, दोघेजण दुचाकीवरून भरधाव निघून गेले. त्यांच्याकडे काळ्या रंगाची दुचाकी होती तर ते अंदाजे २० ते २५ वर्षाचे असल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली. कॅम्प पोलिसांत घटनेची नोंद झाली असून निरीक्षक आनंद वणकुद्रे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news