

खडकलाट : नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना मोटारीच्या वायरला स्पर्श होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना नवलिहाळ (ता. चिकोडी) येथे सोमवारी उशिरा घडली. शशिकांत श्रीमंधर कडगांवे (वय ४७) असे मृताचे आहे. ते विमा एजंट म्हणून कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास शशिकांत कडगांवे हे नवलिहाल गावातील कुंभार गल्ली येथे आपल्या बांधकामाधीन नवीन घराला पाणी मारत होते. दरम्यान जवळच असलेल्या मोटारीच्या वायरला त्यांचा स्पर्श झाला. यावेळी विजेच्या धक्क्याने ते जवळच असलेल्या पाण्याच्या टाकीत पडले आणि बेशुद्ध झाले. ही घटना लक्षात येताच त्यांना तातडीने निपाणी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
याबाबत शशिकांत यांचे बंधू प्रभाकर कडगांवे यांनी पोलिसांत तक्रार दिली असून अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. खडकलाट पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्लहोसूर पुढील तपास करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.