

बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या वृद्धेची सोनसाखळी लांबवल्याची घटना शुक्रवारी (दि. 10) पहाटे घडली. शहरातील गोंधळी गल्लीतील दत्त मंदिरासमोरील बोळात ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी दीड तोळ्याची सोनसाखळी घेऊन पोबारा केला. या प्रकरणी वृद्धेचा मुलगा विनोद सहदेव पाटील (रा. गवळी गल्ली, बेळगाव) यांनी खडेबाजार पोलिसांत फिर्याद दिली आहे.
त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची आई आशा सहदेव पाटील या सकाळी उठून फिरायला गेल्या होत्या. सकाळी 6.20 ते 6.30 च्या सुमारास त्या आपल्या घरी परतत होत्या. गोंधळी गल्लीतील दत्त मंदिरासमोरील बोळातून जात असताना 30 ते 35 वयोगटातील दोघे भामटे दुचाकीवरुन त्यांच्याजवळ आले. काही कळण्याच्या आत त्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीला हिसडा मारला व भरधाव वेगाने निघून गेले. त्यांनी आरडाओरड करेपर्यंत दोघेही पसार झाले. या प्रकरणाची माहिती खडेबाजार पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
आजूबाजूच्या सीसीटीव्हीमधून फुटेज मिळते का, याची चाचपणी केली. दीड तोळ्यांच्या सोनसाखळीची किंमत पोलिसांनी 75 हजार रुपये अशी नोंद करून घेतली आहे. परंतु, सध्याच्या बाजारभावानुसार याची पावणेदोन लाख रुपये किंमत होते. खडेबाजार ठाण्यात नोंद झाली असून निरीक्षक श्रीशैल गाबी तपास करीत आहेत.