खानापूर : गुरे राखण्यासाठी गेलेल्या शेतकरी दांपत्यावर दोन अस्वलांनी हल्ला चढवला. सुदैवाने प्रसंगावधान राखून पत्नी झाडावर चढली. पण पती झाडावर चढत असताना त्याच्या डाव्या पायाच्या पोटरीपासून तळव्याचा अस्वलाने लचका तोडल्याने ते गंभीर जखमी झाले. ही घटना मान (ता. खानापूर) गावापासून २ किलोमीटर अंतरावर रविवारी (दि.२) दुपारी बाराच्या सुमारास घडली. सखाराम महादेव गावकर (वय ६१) असे जखमीचे नाव आहे. त्यांची पत्नी सुलोचना सखाराम गावकर ( वय ५६) या मात्र हल्ल्यातून बचावल्या आहेत.
दोघेही पती- पत्नी गुरे राखायला गावच्या पश्चिमेकडे २ कि. मी. अंतरावर असलेल्या माळरानावर गेले होते. यावेळी जंगलातून आलेल्या दोन अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. तेथून पळ काढत दोघांनीही धूम ठोकली. पण पत्नीला अस्वल गाठून हल्ला करणार असे दिसताच सखाराम यांनी अस्वलांची वाट अडवली. पत्नीला झाडावर चढण्याची सूचना केली. त्याप्रमाणे पत्नी सुलोचना एका झाडावर चढून आरडाओरडा करू लागल्या. इकडे सखाराम त्यांच्याजवळील कोयत्याने अस्वलांचा प्रतिकार करत होते. त्यांच्या तावडीतून सुटका करून घेऊन ते नजीकच्या झाडावर चढू लागले. यावेळी मागून आलेल्या एका अस्वलाने त्यांच्या पायाचे लचके तोडण्यास सुरुवात केली. यामुळे गुडघ्याच्या खाली पायाचे मांस पूर्णपणे सोलून निघाले. कोयत्याने पलटवार करून सखाराम यांनी कशीबशी आपली सुटका करून झाडावर बसून राहिले. तासाभरानंतर अस्वले दूर गेल्यावर दोघेही खाली उतरले.
गंभीर जखमी झाल्याने सखाराम चालण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे सुलोचना यांनी तब्बल एक किलोमीटर आपल्या पाठीवर घेऊन त्यांना उचलून आणले. या ठिकाणी मोबाईलला रेंज आल्याने त्यांनी घडलेली हकीकत मुलीला फोन करून सांगितली. मुलीने गावातील लोकांना ही माहिती देऊन मदतीसाठी जंगलात पाठविले. अखेरीस सायंकाळी पाचच्या सुमारास वनविभागाला माहिती देऊन सखाराम यांना तातडीने बेळगाव सिव्हिल इस्पितळात दाखल करण्यात आले. सोमवारी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. उप वनसंरक्षणाधिकारी मारिया ख्रिस्त राजू आणि खानापूरच्या एसीएफ सुनिता निंबरगी यांनी जखमीची भेट घेऊन विचारपूस केली.
सखाराम यांच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. त्यांचा मुलगा गोव्यातील हॉटेलमध्ये कामाला आहे. उदरनिर्वाहासाठी सखाराम व सुलोचना दोघेही पती-पत्नी जनावर पालनाबरोबरच मिळेल ते काम करतात. डावा पाय निकामी झाल्याने त्यांच्या घरगाड्याचे चाकच निखळले आहे. वनविभागाने उपचारांच्या खर्चाबरोबरच त्यांना भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.