Shivam Associates Financial Scam : ईडीकडून दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत तपासणी

शिवम असोसिएट्‌स गैरव्यवहार प्रकरण : महत्त्वाच्या कागदपत्रांची पडताळणी
Shivam Associates Financial Scam : ईडीकडून दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत तपासणी
Published on
Updated on

बेळगाव : मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासासाठी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) सुरु केलेली चौकशी शनिवारी (दि. ८) सलग दुसऱ्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत सुरु होती. शिवम असोसिएट्सचा संचालक शिवानंद नीलण्णावर यांच्याशी संबंधित ठिकाणी ईडीच्या पथकांकडून आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, बँक खात्यांशी संबंधित नोंदी आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे तपासण्यात आली. शुक्रवारपासून (दि. ७) सुरु झालेल्या या चौकशीमुळे शहरातील व्यावसायिक वर्तुळात चर्चेला उधाण आले असून ईडीच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवबसवनगरमधील शिवम असोसिएट्‌सच्या कार्यालयात ईडीच्या अधिकाऱ्यांनी विविध नोंदींची बारकाईने तपासणी केली. आर्थिक व्यवहारांमध्ये निधीची झालेली हालचाल, संबंधित व्यक्ती व संस्थांमधील आर्थिक देवाणघेवाण तसेच व्यवहारांचा स्रोत याबाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न तपास पथकाकडून सुरु असल्याचे समजते.

शोधमोहीम सुरु असलेल्या परिसरात केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर ईडीने बेळगावात ही कारवाई सुरू केली असून गोवा आणि मंगळूरमधील अधिकारीही या मोहिमेत सहभागी असल्याची माहिती आहे.

तपासादरम्यान कंपनीशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या नोंदी, बँकिंग कागदपत्रे, विविध आर्थिक देवाणघेवाणीचे तपशील आणि इतर कागदपत्रांची छाननी करण्यात येत आहे. या व्यवहारांमध्ये काही अनियमितता आढळते का किंवा संशयास्पद आर्थिक व्यवहारांची साखळी आहे का, याचा शोध ईडीकडून घेतला जात आहे. सलग दोन दिवस सुरु असलेल्या कारवाईमुळे तपासाची व्याप्ती संबंधित कंपनीपुरतीच मर्यादित न राहता तिच्याशी जोडलेल्या व्यक्ती, संस्था आणि आर्थिक व्यवहारांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news