

बेळगाव : जुलै २०२७ पर्यंत लोकांना आणि पशुधनाला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी कृती आराखडा तयार करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी (दि. १८) आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत ते बोलत होते.
ते म्हणाले, जिल्ह्याला महाराष्ट्राकडून लागणाऱ्या पाण्याच्या प्रमाणाचा अचूक अंदाज घ्यावा आणि मागणीनुसार पाणी मिळवण्यासाठी तयारी करावी. जुलै २०२७ पर्यंत जलाशयांमधील पाणी केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच वापरले जाईल, हे निश्चित करण्यासाठी एक कृती आराखडा तयार केला पाहिजे. पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्याच्या उद्देशाने अनधिकृत पंपसेटचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
ग्राम पंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्यास, ग्राम पंचायतींमध्ये उपलब्ध असलेल्या टँकरमार्फत जनतेला आणि पशुधनाला पाणीपुरवठा करावा. आवश्यकता भासल्यास टँकरमार्फत पाणीपुरवठा करण्यासाठी आगाऊ निविदा प्रक्रिया राबवावेत. येत्या काळात पशुधनाच्या चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता असल्याने, गरज पडल्यास चारा बँका सुरु करण्याची तयारी करावी. चारा पुरवठ्यासाठी आगाऊ निविदा मागवाव्यात.
अधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची समस्या टाळण्यासाठी एकमेकांशी समन्वय साधून आवश्यक खबरदारीचे उपाय योजावेत, असेही रोशन यांनी सांगितले. निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंग आणि जिल्हास्तरीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.