

बेळगाव : कित्तूर तालुक्यातील अवरादी ग्राम पंचायत कार्यालयात मालमत्तेच्या वादातून बाप-लेकीची निर्घृण हत्या केल्या प्रकरणाचा कित्तूर पोलिसांनी छडा लावत तिघांना अटक केली आहे. बसप्पा शिवनप्पा कुंदरगी (वय ६९), संगप्पा शिवनप्पा कुंदरगी ( वय ५५) आणि मडीवाळप्पा बसाप्पा कुंदरगी (वय ३४ सर्व रा. अवरादी, ता. कित्तूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
बुधवार दि. १६ रोजी सकाळी सुमारे ११ च्या सुमारास रुद्राप्पा शिवनाप्पा कुंदरगी आणि त्यांची मुलगी शशिकला हे अवरादी ग्राम पंचायत कार्यालयात आले होते. अवरादी गावातील मालमत्ता क्रमांक १३५ च्या नोंदणी अर्जाच्या दुरुस्ती करण्यासाठी ते उपस्थित होते. यावेळी मालमत्तेच्या वादातून बसाप्पा, संगाप्पा आणि मडीवाळप्पा कुंदरगी यांनी रुद्रप्पा व शशिकला यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी आलेल्या राहुल याच्यावरही संशयितांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने काठीने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले होते. याप्रकरणी कित्तूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १०९, ६२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस प्रमुख के. रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख आर. बी. बसरगी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. कित्तूर सर्कलचे पोलिस निरीक्षक शिवानंद बी. गुडगनट्टी, पोलिस उपनिरीक्षक भरत एस., उपनिरीक्षक जी. जी. हंपण्णावर आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्रे गतिमान करून तिन्ही संशयितांना शुक्रवारी दि. १८ रोजी अटक केली.
या कारवाईबद्दल तपास पथकातील निरीक्षक शिवानंद बी. गुडगनट्टी, उपनिरीक्षक भरत एस., उपनिरीक्षक जी. जी. हंपण्णावर, एएसआय एम. बी. वस्त्रद तसेच आर. एस. शिली, ए. डी. हन्नीकेरी, डी. एम. गरगद, एम. बी. कुंभार, एम. एम. कांबळे, एस. ए. दफेदार, एस. एम. मुरगोड, एम. एम. चिक्केरी, एम. के. गळगी आणि नागराज कडगन्नावर यांचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.