

बेळगाव : शहरातील दोन महिलांची तब्बल २२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. यापैकी एका प्रकरणात पोलिस चौकशी व डिजिटल अरेस्टची भीती दाखवून १५ लाख रुपये लाटण्यात आले, तर दुसऱ्या घटनेत तुमचे मेगा गॅसचे बिल भरलेले नाही, असे सांगत बँक खात्यावरील ७ लाख रुपये वर्ग करुन घेण्यात आले. दोन्ही घटनांची शहर सीईएन पोलिसांत नोंद झाली आहे.
भाग्यनगरमधील विजया नामक डॉक्टर महिलेला १ एप्रिल रोजी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. यानंतर त्यांना व्हिडीओ कॉल करून दिल्ली उच्च न्यायालयात तुम्हाला चौकशीसाठी यावे लागेल, असे समोरच्या भामट्याने सांगितले. यावेळी त्यांनी दिल्लीचे उच्च न्यायालय व समोर बसलेले न्यायाधीश असे सर्व काही दाखवले. त्यामुळे या महिलेचा त्यांच्यावर विश्वास बसला. यानंतर त्यांनी सतत कॉल करून चौकशीसाठी यावेच लागेल, अशी धमकी दिली. हे कुणाला सांगितल्यास कारवाई आणखी कडक होईल, असेही धमकावले.
तुमच्या खात्यावर जी रक्कम असेल ती पाठवून द्या, असे म्हणत सदर महिलेने बँकेत ठेव ठेवलेल्या खात्याचा व्हिडीओ कॉलवर सर्व काही तपशील दिला. त्यानंतर भामट्यांनी ९ एप्रिल रोजी सदर महिलेच्या कॅनरा बँकेत असलेल्या खात्यावरील १५ लाख रुपयांची रक्कम काढून घेतली. आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर सदर महिलेने शुक्रवारी (दि. १९) शहर सीईएन पोलिसांत नोंद झाली आहे.