

खानापूर : वीजवाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट होऊन उडालेल्या ठिणगीमुळे सुमारे दोन एकर ऊस जळून खाक झाला. खानापूर तालुक्यातील ढोकेगाळीत मंगळवारी (दि. २७) ही दुर्घटना घडली. जगदीश पाटील जळीतग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून शॉर्टसर्किटमुळे ऊस पिकांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. कान्सुली, गणेबैलसह विविध गावांमध्ये ऊस जळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता ढोकेगाळीतील घटनेमुळे वीजवाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेचा पंचनामा करून नुकसानीचे योग्य मूल्यमापन करावे आणि पाटील यांना नियमानुसार भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
ऊस पिकासाठी शेतकरी खत, पाणी आणि मशागतीवर मोठा खर्च करतात. मात्र, तोडणीच्या टप्प्यावर आग लागल्याने वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरत आहे. त्यामुळे हेस्कॉमने शेतातून जाणाऱ्या वीजवाहिन्यांची तातडीने तपासणी करुन सैल व जीर्ण तारांची दुरुस्ती करावी. तसेच नियमित देखभाल व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.