

बेळगाव : इंडिगोची दिल्ली-बेळगाव विमानसेवा १ ऑक्टोबरपासून आठवड्याचे सातही दिवस सुरु राहणार आहे, अशी माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी ही सेवा आठवड्यातील केवळ तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी मर्यादित करण्यात आली होती.
इंडिगोकडून यापूर्वी दिल्ली-बेळगाव मार्गावर रोज विमानसेवा उपलब्ध होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी ही सेवा सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी तीन दिवस सुरु ठेवली होती. त्यामुळे उद्योजक, व्यापारी, डॉक्टर तसेच स्थानिक प्रवाशांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन विमानसेवा पुन्हा रोज सुरु करण्याची मागणी खासदार शेट्टर यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांना भेटून केली होती. तसेच इंडिगोच्या अधिकाऱ्यांशीही पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानंतर इंडिगोकडून १ ऑक्टोबरपासून या मार्गावर रोज विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्या वेळापत्रकानुसार विमान रोज सकाळी ६.१५ वाजता दिल्लीहून रवाना होऊन सकाळी ८.४० वाजता बेळगावला पोचेल. परतीच्या प्रवासात सकाळी ९.१० वाजता बेळगावहून सुटून सकाळी ११.४० वाजता दिल्लीला पोचेल. दरम्यान, बंगळूर-बेळगाव मार्गावरील सकाळची विमानसेवाही १ ऑक्टोबरपासून आठवड्यातील चार दिवसांऐवजी सातही दिवस उपलब्ध होणार आहे. सध्या ही सेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या चार दिवशी सुरु आहे.
याशिवाय मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी सुरु असलेली सायंकाळची विमानसेवाही कायम राहणार आहे. आगामी काळात ही सायंकाळची सेवाही रोज सुरु करण्याबाबत इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याचे खासदार शेट्टर यांनी सांगितले. दिल्ली आणि बंगळूर या दोन्ही महत्त्वाच्या शहरांशी बेळगावची हवाई कनेक्टिव्हिटी वाढणार असल्याने प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.