

निपाणी : यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यानंतर दीर्घकाळ पावसाने दडी मारल्याने निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेरणीनंतर उगवण झालेल्या पिकांना वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आवश्यक तेवढा पाऊस न मिळाल्याने पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, भुईमूग, तूर, उडीद, मूग तसेच इतर खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली होती. सुरुवातीला पिकांची उगवणही चांगली झाली. मात्र त्यानंतर जवळपास चार आठवड्यांहून अधिक काळ पावसाने विश्रांती घेतल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे.
सध्या ही पिके वाढीच्या अवस्थेत असून त्यांना पावसाची नितांत गरज आहे. यात अनेक ठिकाणी पिकांची पाने पिवळी पडू लागली असून काही भागात वाढ खुंटल्याचे चित्र दिसत आहे. हलक्या जमिनीवरील पिकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. अद्याप दोन-तीन दिवसांत चांगला पाऊस झाल्यास काही प्रमाणात परिस्थिती दुसऱ्या टप्प्यात पेरणी झालेल्या पिकांची सुधारू शकते; मात्र पाऊस आणखी लांबल्यास उत्पादनात मोठी घट अटळ मानली जात आहे.
पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हिरव्या चाऱ्याची वाढ मंदावल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे विहिरी, बोअरवेल आणि लहान जलस्रोतांतील पाणीही कमी होऊ लागल्याने सिंचनाची उपलब्धता मर्यादित झाली आहे.
यंदाच्या खरीप हंगामातील अपेक्षित उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत होण्याची भीती आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा आगामी पावसाकडे लागल्या असून रब्बी हंगामासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईल का, याबाबतही शेतकरी साशंक आहेत. आगामी काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यासच खरीप पिकांना दिलासा मिळणार आहे. अन्यथा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.