

बंगळूर : कृषी क्षेत्रातील नवीन बदल प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. शेती फायदेशीर ठरली तरच तरुण शेतीकडे वळेल. या दिशेने एफकेसीसीआयचे प्रयत्न चांगले असल्याचे मत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले. कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे आयोजित ’ग्लोबल ॲग्रीटेक समिट 2026’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, भारत कृषीप्रधान देश आहे. शेतीला शाश्वत व फायदेशीर बनवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची तरुण पिढी शेतीपासून दूर जात आहे. जर शेती फायदेशीर ठरली तर तरुण पिढी नैसर्गिकरित्या शेतीकडे वळेल. सरकारने शेतीला फायदेशीर बनवण्यासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत.
बंगळूर कृषी तंत्रज्ञानाचीही राजधानी बनली पाहिजे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसह सर्व क्षेत्रांतील तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. राज्यात कोरडवाहू जमिनीचे प्रमाण जास्त असून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेती फायदेशीर करणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने कृषी भाग्य योजना राबवली. सर्वाधिक कोरडवाहू जमीन असलेल्या राज्यांमध्ये कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
भाजपवर टीका
भाजप सत्तेवर आल्यावर कृषी भाग्य योजना स्थगित करण्यात आली होती. काँग्रेस सरकारने ही योजना पुन्हा सुरू केली आहे. सुमारे 83 लाख शेतकऱ्यांना 70 हजार कोटी रुपयांचे कृषी कर्ज देण्यात आले आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या पायाभूत सुविधांसाठी 8 हजार कोटी रुपये बाजूला ठेवण्यात आले होते. उद्योग व ग्रामीण विकासात कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे. कृषी क्षेत्रातही गुंतवणूक वाढली पाहिजे. तरच शेती फायदेशीर होणार असल्याचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या म्हणाले.