

बेळगाव : शहरात 180 झाडे धोकादायक स्थितीत आहेत. त्यापैकी 30 झाडे तातडीने हटवण्याची गरज आहे. मात्र, ही धोकादायक झाडे तोडण्यास वनखात्याने परवानगी दिली नसल्याचे हेस्कॉमचे म्हणणे आहे. तर महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार धोकादायक झाडे तोडण्यास आधीच परवानगी दिल्याचा दावा वनखात्याने केला आहे.
गेल्या चार दिवसांपासून सर्वत्र संततधार पाऊस पडत आहे. दोन दिवसांपूर्वी सदाशिवनगरात झाडाची फांदी कारवर पडून कारचे नुकसान झाले. मंगळवारी रात्री किल्ल्यामध्ये झाडाची फांदी वीजवाहिनीवर पडल्याने ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले. त्यामुळे, मंगळवारी दिवसभर या भागात वीजपुरवठा ठप्प झाला होता. बुधवारी सकाळी अंबाभुवनजवळ झाडाची फांदी रस्त्यावरच पडली. सुदैवाने या घटनेत दुर्घटना घडली नाही. शहरात 180 पैकी 30 झाडे धोकादायक स्थितीत आहेत. ती तातडीने हटविणे गरजेचे आहे. अन्यथा दुर्घटना घडण्याचा धोका आहे.
धोकादायक झाडे तोडण्यासाठी हेस्कॉम सातत्याने वनखात्याकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, वनखाते झाडे तोडण्यास परवानगी देत नसल्याने लहान मोठ्या दुर्घटना घडत असल्याचे हेस्कॉमचे म्हणणे आहे. यासंबंधी वनखात्याच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता शहरात 180 झाडे धोकादायक स्थितीत असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
शहरात महापालिका, हेस्कॉम व वनखात्याने मिळून धोकादायक झाडांचा सर्व्हे केला आहे. त्याप्रमाणे महापालिकेला झाडे तोडण्यासाठी परवानगी दिली आहे. एकूण 100 हून अधिक झाडे तोडण्यासाठी रितसर परवानगी दिली आहे. यासंदर्भात हेस्कॉमशी चर्चा केली जाईल.
मारीया ख्रिस्तू राजा, उपवनसरंक्षण अधिकारी
शहरात 30 झाडे धोकादायक आहेत. ती पावसात कधीही जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. ही झाडे तोडण्यासाठी वनखाते परवानगी देऊन हेस्कॉमला सहकार्य करत नाही. भविष्यातील अपघातची मालिका टाळण्यासाठी वनखात्याने सहकार्य करावे.
मनोहर सुतार, शहर अभियंता, हेस्कॉम.