

बेळगाव : कुठे आहेस जरा इकडे ये, असे म्हणून एका तळीरामाने दुसर्या तळीरामाला बोलावून घेतले. त्याला दारू पाजली, त्यानंतर मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवलेली रक्कम लांबविली. यामुळे वादावादी होऊन मारामारी झाल्याची घटना धर्मवीर संभाजी चौकातील संचयनी सर्कल परिसरात गुरुवारी (दि. 27) दुपारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, हणमंत नामक तरुणाला त्याच्या मित्राने फोन केला. व बोलावून घेतले. कॅम्पमध्ये असलेल्या एका दारूच्या दुकानात फोन केलेल्या व्यक्तीसोबत आणखी चौघे होते. या सर्वांनी मद्यप्राशन केले. फोन करुन बोलावलेल्या तळीरामाची नजर हणमंत याच्या मोबाईलवर गेली. हणमंत याने फोनच्या कव्हरमध्ये 3 हजार रुपये ठेवले होते. ती रक्कम लांबवण्यासाठी त्याच्याकडे मोबाईलची मागणी केली. त्याने तो फोन दिला. मात्र त्यामधील रक्कम आणि सीमकार्डही हातोहात लांबविले.
हणमंतला घरी गेल्यानंतर आपले सीमकार्ड आणि रक्कम नसल्याचे समजले. त्यानंतर तो पुन्हा त्या ठिकाणी आला व त्याने सीमकार्ड व रकमेची मागणी केली. त्यावर त्याला मारहाण करून चाकूने हल्ला करण्यात आला. यामध्ये हणमंत जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत खडेबाजार पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली नव्हती.