

बेळगाव : दागिने बनविण्यासाठी व दुरुस्तीसाठी दिलेला सोन्याचा हार घेऊन पळून जाणाऱ्या कारागिराला शहापूर पोलिसांनी गुरुवारी (दि. ४) अटक केली. त्याच्याकडून सुमारे १६ लाख रुपये किंमतीचे १०४ ग्रॅम सोने जप्त केले. कृष्णा मोहन मैती (वय ३६, मूळ रा. विजयवाडा, आंध्र प्रदेश, सध्या रा. केएलई आयुर्वेदिक कॉलेजजवळ शहापूर) असे संशयिताचे नाव आहे.
सदर तरुण नार्वेकर गल्लीतील एकाकडे सोन्याचे दागिने बनविण्यासाठी कामाला होता. त्याच्याकडे सोन्याचे बिस्कीट व दुरुस्तीसाठी एक हार दिला होता. परंतु, हा हार व बिस्कीट घेऊन कृष्णा हा पळून गेला होता. याप्रकरणी मालकाने शहापूर पोलिसांत फिर्याद दिली होती. तेव्हापासून त्याचा शोध शहापूर पोलिसांकडून सुरु होता. त्याला गुरुवारी शहापूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून उपरोक्त किंमतीचे सोने जप्त केले.
पोलिस निरीक्षक एस. एस. सीमानी, उपनिरीक्षक मणीकंठ पुजारी, उपनिरीक्षक एस. एन. बसव्वा यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन शिरसंगी, शंकर गुडदैगोळ, श्रीधर तळवार, अजित शिपुरे, शिवराज पच्चन्नवर, श्रीरंग भस्मे, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशीद यांनी ही कारवाई केली.