

खानापूर : घराच्या परसातील झाडावरचे नारळ लोखंडी पाईपने पाडताना पाईपचा स्पर्श वीजेच्या तारांना होऊन पती-पत्नीचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. पतीला विजेचा धक्का बसल्याचे पाहून त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या पत्नीचाही वीजेने बळी घेतला. खानापूर तालुक्यातील संगरगाळी गावात शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली. हृदयद्रावक घटनेने परिसर सुन्न झाला आहे.
सालू शावेर मस्करेन (वय ७०) आणि त्यांच्या पत्नी मिलाग्रीन सालू मस्केरन (वय ६५) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मस्करेन दाम्पत्याची संगरगाळी गावात दोन घरे आहेत. त्यांचा मुलगा कामनिमित्त गोव्यात राहतो. चव्हाटा मंदिराजवळील नव्या घरात ते वास्तव्यास होते. जुन्या घराच्या परसात नारळाची झाडे आहेत. शनिवारी दुपारी सुमारे १२.३० वाजता सालू नारळ काढण्यासाठी गेले होते. हातात लोखंडी पाइप घेऊन ते झाडावरील नारळ काढत होते. पत्नी मिलाग्रीनही त्यांच्यासोबत होत्या.
झाडाजवळून ११ हजार व्होल्ट क्षमतेची उच्चदाबाची विद्युत वाहिनी गेली आहे. नारळ काढताना अचानक त्यांच्या हातातील लोखंडी पाइपचा वीजभारित तारेला स्पर्श झाला. क्षणात विजेचा तीव्र झटका बसल्याने सालू मस्करेन पाइपला चिकटून राहिले. पतीला तडफडताना पाहून पत्नीने त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली; मात्र नियतीचा घाला इतका भीषण होता की, त्यांनाही विजेचा धक्का बसला. दुर्घटनेत सालू मस्करेन यांचा मृतदेह पूर्णपणे भाजल्याने ओळख पटविणेही कठीण झाले होते. क्षणभरापूर्वी एकमेकांच्या सहवासात असलेले पती-पत्नी काही क्षणांतच कायमचे दूर गेले. त्यांच्या निधनाने संगरगाळी गावावर शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच खानापूरचे पोलीस निरीक्षक एल. एच. गवंडी आणि पोलीस उपनिरीक्षक निरंजन स्वामी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह खानापूर सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
आई-वडिलांचे छत्र हरपले
मस्करेन दाम्पत्याच्या पश्चात एक मुलगा आहे. आई-वडिलांचे छत्र एकाच वेळी हरपल्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घराच्या परसातील झाडावरचे नारळ काढताना घडलेल्या या दुर्घटनेने वीज वाहिन्यांजवळ काम करताना असलेल्या धोक्याची जाणीव पुन्हा एकदा करून दिली आहे.