

बेळगाव : घराचे बांधकाम सुरू असताना लोखंडी सळईचा स्पर्श वीज वाहिनीला झाल्याने विजेचा जोरदार धक्का बसून एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. मुडलगीतील केएबी प्लॉट परिसरात मंगळवारी (दि. १०) ही दुर्घटना घडली. इम्रान मुजावर (वय ३५, रा. मुडलगी) असे मृताचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, संबंधित इमारतीत सात कामगार सेंट्रिंगचे काम करीत होते. इमारतीजवळून वीजवाहिन्या गेल्या आहेत. काम सुरू असताना हाताळण्यात येणारी लोखंडी सळई अचानक वीजवाहिनीच्या संपर्कात आली. त्यामुळे इम्रान यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेच्या काही वेळापूर्वी इमारतीवर काम करणारे अन्य सहा कामगार चहा पिण्यासाठी खाली उतरले होते. त्यामुळे ते या दुर्घटनेतून बचावले. घटनेची नोंद मुडलगी पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरु आहे.