

बंगळूर : बेळगाव येथे सोमवारी झालेल्या काँग्रेस मेळाव्यात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने काँग्रेस आणि भाजप कायकर्त्यांमध्ये जुंपली होती. या मेळाव्यातील सुरक्षेच्या त्रुटींबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिले आहेत. बंगळूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजप महिला आघाडीच्या पाच-सहा कार्यकर्त्या काँग्रेसची शाल घालून आल्या आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या बोलत असताना त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. भाजप कार्यकर्त्या काँग्रेसची शाल घालून कशा आल्या, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून सुरक्षेतील त्रुटींबाबत अहवाल देण्याचे आदेश त्यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालकांना (कायदा आणि सुव्यवस्था) दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध नको म्हटलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
गरज पडल्यास लढण्यास कोणताही आक्षेप नाही, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे वारंवार त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. पहलगाम मुद्द्यावर काँग्रेस नेते मवाळ भूमिका घेत नाहीत. देशाच्या सुरक्षेसाठी काँग्रेस इतके बलिदान दुसरे कोणीही देऊ शकत नाही. आपल्याला इतरांकडून धडा घेण्याची गरज नाही. राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी प्रत्येकाची आहे. सर्वपक्षीय
बैठकीत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्याला दहशतवादी घटनांकडे नि:ष्पक्षपणे पाहण्याची गरज आहे. राजकारण विसरून या संकटाविरुद्ध एकत्र उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. मंत्री के. एन. राजण्णा यांनी सीडी प्रकरणात त्यांचे म्हणणे नोंदवले आहे. संपूर्ण अहवाल आल्यानंतर तपासावर बोलणे योग्य ठरेल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.