

बेळगाव ः जन्म आणि मृत्यूच्या नोंदी प्रत्येकासाठी खूप महत्वाच्या आहेत. या नोंदीतील त्रुटी टाळण्यासाठी त्यांची अत्यंत काळजीपूर्वक नोंद करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केल्या. जिल्हा जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागाच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक बुधवारी (दि. 14) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
जिल्ह्यातील जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेत 100 टक्के प्रगती साधण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. जन्म आणि मृत्यू नोंदणी नोंदी जतन करणे आणि देखभाल करणे खूप महत्वाचे आहे. नोंदणीवेळी योग्य नोंदी संगणकीकृत केल्या पाहिजेत. जन्म आणि मृत्यू नोंदणी दरम्यान कोणत्याही चुका होऊ नयेत, यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले पाहिजे. त्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली.
नोंदणीसाठी वसूल केलेले शुल्क नियमितपणे सरकारला भरावे. मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक तपासली पाहिजेत आणि जन्म आणि मृत्यू नोंदणी नोंदी सक्तीने कराव्यात. तालुकास्तरावर स्थापन केलेल्या नोंदणी प्रणाली समन्वय समितीला नियमित बैठका घेण्याचे आणि कोणत्याही कारणास्तव जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेत विलंब होऊ देऊ नये अशा सूचना जिल्हाधिकारी रोशन यांनी केल्या. बैठकीला निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, तहसीलदार बसवराज नागराळ, महापालिका आरोग्य विभागप्रमुख, स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्य अधिकारी उपस्थित होते.