

बेळगाव : शहर परिसरात थंडीची लाट तीव्र झाली असून शनिवारी (दि. २१) सकाळी किमान तापमानाचा पारा थेट ९.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी तापमानात तब्बल ६.९ अंश सेल्सिअसची मोठी घट नोंदवण्यात आली. गेल्या चार दिवसापासून थंडीची चाहूल लागली असून पारा घसरला आहे. पहाटेच्या वेळी व रात्री थंडी वाढत आहे.
यावर्षी नोव्हेंबर उजाडला तरी गुलाबी थंडी गायब झाली होती. एरव्ही दिवाळीमध्ये जोरदार थंडी पडते. यंदा मात्र दिवाळी संपताच थंडीला सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. नोव्हेंबरमध्ये थंडी बऱ्यापैकी पडणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. हिमालयातील हवामान बदलामुळे दक्षिण भारताकडे शीत वारे वाहू लागले असून थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर का होईना हुडहुडी भरण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे आता उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
बेळगाव जिल्ह्यासह परिसरात परतीचा पाऊस क्वचितच पडला आहे. त्यामुळे नागरिकांना ऑक्टोबर महिन्यात उष्म्याचे चटके सहन करावे लागले. वास्तविक ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस कमी होऊन थंडीला सुरुवात होते. मात्र, यावर्षी नागरिकांना नोव्हेंबर महिन्यात थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीची चाहूल लागल्याने हा सीझन कॅश करण्यासाठी व्यापारीही सज्ज झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी उबदार कपड्यांचे स्टॉल पाहायला मिळत असून खरेदीतही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
एकीकडे भातमळण्यांना सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना थंडीचा सामना करावा लागत आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करताना दिसत असून, आगामी काही दिवसांत थंडीचा कडाका असाच कायम राहण्याचा अंदाज आहे.
आरोग्याची घ्या काळजी
थंडीत विषाणूजन्य आजार होण्याची शक्यता असते. शहरात वाढलेली धूळ आणि प्रदूषण नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकते. त्यामुळे साधारण थंडीत सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंग दुखणे अशा तक्रारी डोके वर काढतात. त्यामुळे थंडीत घराबाहेर पडताना नागरिकांनी उबदार कपडे वापरावेत, असा सल्ला डॉक्टर देतात.
शीतपेये, शिळे पदार्थ, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे. या काळात शरीरातील ऊर्जा जास्त खर्च होत असल्याने भूक लागते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा आहार सेवन करावा. नियमित व्यायाम, मॉर्निंग वॉक निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.