

बेळगाव : महापालिकेच्या आरोग्य विभागाचा गलथानपणा पुन्हा समोर आला आहे. शहराच्या भरवस्तीत कचरा वर्गीकरण करण्यात येत असल्यामुळे लोकांत संताप व्यक्त होत आहे. फोर्ट रोड येथे महापालिकेकडून कचरा वर्गीकरण करण्यात येत आहे. याचा त्रास परिसरातील लोकांना आणि रहदारीवर होत आहे.
महापालिकेच्या घंटागाडी कडून शहरातील विविध भागातून घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जाते. त्यानंतर तो कचरा थेट तुरमुरी येथे घेऊन न जाता शहरातील काही ठिकाणी वर्गीकरण करण्यात येत आहे. घरोघरी कचरा संकलन करणाऱ्या लहान वाहनातून फोर्ट रोड येथे कचरा जमा करण्यात येतो. त्यानंतर तो वर्गीकरण करून मोठ्या वाहनात भरून डेपोकडे पाठवण्यात येतो.
सकाळी रोज अशाप्रकारे कचरा वर्गीकरण करण्यात येत असल्यामुळे परिसरातील लोकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय या भागात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पण कचरा वर्गीकरणामुळे रहदारीला अडथळा होत आहे. त्यामुळे महापालिकेने शहराबाहेर जाऊन कचरा वर्गीकरण करावा, अशी मागणी होत आहे. याबाबत आता महापालिकेचा आरोग्य विभाग कोणता निर्णय घेते हे पाहावे लागणार.