

बेळगाव : चव्हाट गल्ली-ढोर गल्लीत सोमवारी (दि. १४) झालेल्या अग्निकांडात धमुणे कुटुंबातील सहाजणांचा मृत्यू झाला होता. आता सात दिवसांनी या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. घटनेपूर्वी धमुणेंच्या घराशेजारील शेडच्या दिशेने एक अनोळखी व्यक्ती बकेट घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. काही वेळ परिसरात थांबल्यानंतर ही व्यक्ती बकेटशिवाय तेथून धावत निघून गेल्याचेही फुटेजमध्ये दिसत आहे. या व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.
धमुणे कुटुंबीयांच्या घराशेजारील परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांकडून पाहणी करण्यात आल्यानंतर ही बाब समोर आली. फुटेजमध्ये एक व्यक्ती बकेट घेऊन शेडजवळ येताना दिसत आहे. ती सुमारे चार ते पाच मिनिटे शेड परिसरात थांबते. त्यानंतर बकेटशिवाय तेथून धावत निघून जाते. या घटनेच्या काही वेळ आधीची ही हालचाल तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. संबंधित व्यक्ती कोण आहे, ती बकेट घेऊन शेडजवळ का आली होती, तेथे नेमके काय केले आणि बकेटशिवाय तेथून का धावत निघून गेली, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
परिसरातील अन्य सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिच्या हालचालींचा मागोवा घेण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. अग्निकांडात धमुणे कुटुंबातील सहाजणांचा मृत्यू झाला होता. शारदा धमुणे, भारती धमुणे, प्रिया धमुणे, गंगा धमुणे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर गजानन धमुणे व रोशन दमुणे यांचा दुसऱ्या दिवशी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. शॉर्टसर्किट आणि फ्रिजच्या स्फोटामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आता सीसीटीव्ही फुटेजमध्ये बकेट घेतलेली व्यक्ती कैद झाल्याने संशयाला वाव मिळाला आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी विविध शक्यता तपासल्या जात आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यासह तिच्या हालचालींची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांकडून दोघांची चौकशी
फुटेजमुळे पोलिसांच्या तपासाला एक दिशा मिळाली असली तरी केवळ सीसीटीव्हीतील हालचालींच्या आधारे संबंधित व्यक्तीचा घटनेची थेट संबंध जोडणे अवघड आहे. तरीसुद्धा याप्रकरणी पोलिसांनी काहीजणांची चौकशी सुरु केली आहे. रविवारीच दोघांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडून सखोल माहिती घेतली जात आहे.