

बेळगाव : सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याच्या गंभीर प्रकाराची शहरातील सायबर क्राईम पोलिसांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध फिर्याद दाखल करुन गुन्हा नोंदविला आहे. संबंधित व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या मोबाईल क्रमांकांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मार्च २०२६ रोजी अल्पवयीन मुलांशी संबंधित दोन आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले होते. यापैकी एक व्हिडिओ ५२ सेकंदांचा तर दुसरा १३ सेकंदांचा असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर सायबर क्राईम विभागाने संबंधित मोबाईल क्रमांकांची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.
अल्पवयीन मुलांशी संबंधित अश्लील सामग्री सोशल मीडिया आणि इंटरनेटवर प्रसारित करणाऱ्यांवर केंद्रीय यंत्रणांकडूनही लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा प्रकारची सामग्री प्रसारित करणाऱ्या मोबाईल क्रमांकांची व वापरकर्त्यांची माहिती संबंधित राज्यातील सीआयडी आणि सायबर क्राईम विभागाकडे पाठविली जात आहे. केंद्रीय यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार संबंधित क्रमांकांची पडताळणी करुन पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
शहरातील प्रकरणातही याच पद्धतीने माहिती प्राप्त झाल्यानंतर सरकारतर्फे फिर्याद नोंदविण्यात आली आहे. संबंधित व्यक्तींची ओळख, व्हिडिओ प्रसारित करण्यामागील उद्देश आणि या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सायबर पोलिसांकडून केला जात आहे.