

बेळगाव, अंकली : ऊसदर आंदोलनात शुक्रवारी झालेली दगडफेक आणि तोडफोडीप्रकरणी यमकनमर्डी पोलिसांनी 11 आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. दगडफेकीत अकरा पोलिस जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांवर उपचार सुरू असून शनिवारी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक हितेंद्र एस. यांनी जखमींची जिल्हा रुग्णालय तसेच केएलई रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. दरम्यान, राज्य सरकारने ऊसाला 3300 रुपये दर देण्याचा आदेश शनिवारी शेतकऱी नेत्यांकडे सुपूर्द केला. साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी मुडलगीजवळील गुर्लापूर नाक्यावर आंदोलक नेत्यांची भेट घेऊन सरकारी आदेश हस्तांतरित केला.
शुक्रवारी दुपारी शेतकऱ्यांनी वाढीव ऊसदरासाठी बेळगाव-कोल्हापूर महामार्ग रोखून धरत हत्तरगी टोल नाक्यावर दगडफेक आणि तोडफोड केली होती. ऊसाला साडेतीन हजार रुपये टन दर मिळावा, यासाठी आंदोलन सुरू असताना आंदोलक हिंसक बनले होते. त्यांनी केलेल्या दगडफेकी अकरा पोलिस जखमी झाले असून यापैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय बसेससह अन्य वाहनांचेही नुकसान झाले. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण तपासून शनिवारी 11 जणांवर गुन्हा दाखल केला. सरकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यासह विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी पुढील तपास करीत आहेत.
यंदा ऊसाला प्रति टन 3300 रुपये दर देण्याचा निर्णय झाल्यानंतर शनिवारी या निर्णयाची प्रत साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी आंदोलक नेत्यांना दिली. पाटील यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून शेतकरी संघटनेचे नेते चुनाप्पा पुजारी, शशिकांत पडसलगी, मुगळखोड मठाचे मुरुघराजेंद्र स्वामींकडे सुपूर्द केली.
गेल्या दहा दिवसांपासून गुर्लापूर क्रॉसवर सुरू असलेल्या आंदोलनाचा शुक्रवारी शेवट झाला. मात्र राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचा आदेश आम्हाला पोचेपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार, असे काही शेतकऱ्यांनी सांगितल्याने शनिवारी दुपारी साखर मंत्री पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन शासनाच्या आदेशाची प्रत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली.
खासगी साखर कारखान्यांच्या समोर राज्य शासनाकडून वजन काटा उभारण्यात यावा, उसाचा उतारा तपासण्यासाठी स्वतंत्र शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शासनाचे अधिकारी नेमावेत, गाळपानंतर 14 दिवसांत बिल रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी, अन्यथा व्याजासहित हप्ता देण्यात यावा, अशा मागण्या शेतकऱ्यांनी साखर मंत्र्यांकडे केल्या. त्यावर मंत्र्यांनी साखर आयुक्तांच्या नेतृत्त्वाखाली अधिकारी नेमून प्रत्येक कारखान्यात आठ दिवसांतून एकदा उसाच्या उताऱ्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मी आठव्या दिवशी आंदोलनस्थळी येत असताना माझ्या प्रतिमेची प्रतिमात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. मी जिवंत असूनही माझी अंत्ययात्रा मला माझ्या उघड्या डोळ्यांनी मला पहावयास मिळाली, अशी खंत मंत्री पाटील यांनी व्यक्त केली. त्यावर शेतकऱ्यांनी आपल्याकडून चूक झाल्याचे सांगत क्षमा मागितली.