Belgaum News: कॅम्पमध्ये प्रकल्प तीन, मात्र लाभहीन!

कॅण्टोन्मेंट बोर्ड हद्दीत रखडलेले प्रकल्प मार्गी कधी लागणार?
Belgaum News: कॅम्पमध्ये प्रकल्प तीन, मात्र लाभहीन!
Published on
Updated on

बेळगाव : कॅम्प परिसरातील रहिवाशांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योजक आणि सामाजिक संस्थांच्या सहाकार्यातून उभारण्यात आलेले प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे त्यापासून रहिवाशांना सुविधा तर मिळाल्याच नाहीत, उलट निधी खर्च होऊनही हे प्रकल्प अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे प्रकल्प बहु, पण उपयोग शून्य अशी स्थिती किमान तीन प्रकल्पांच्या बाबतीत झाली आहे.

कॅण्टोन्मेंट बोर्डने रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या मदतीने अशुद्ध पाणी शुद्ध करण्यासाठी फिशमार्केट व धोबी घाटाजवळ एकक उभारण्यात आले. त्यावर ७६ लाखांचा खर्च करण्यात आला. पण दोन्ही एकक बंद आहेत. पाणी शुद्धीकरण सुरू झालेले नाही.

कॅम्प परिसरात रोटरीने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प फिश मार्केट व धोबी घाटाशेजारी उभारला. त्यांचे उद्‌घाटन तत्कालीन अध्यक्ष ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांच्या उपस्थितीत खासदार जगदीश शेट्टर, जयभारत फाउंडेशनचे ट्रस्टी जयंत हुंबरवाडी, शरद पै, सीईओ राजीवकुमार, गिरीष धोंड यांच्या उपस्थितीत पार पडले होते. बुचर स्ट्रीट टॉयलेट ब्लॉकजवळ हा सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प उभारण्यात आला. त्याची दिवसा एक लाख लिटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे. तसाच दुसरा प्रकल्प धोबीघाट नाल्याशेजारी उभारण्यात आला.

प्रकल्पाद्वारे मिळणाऱ्या पाण्याचा वापर साफसफाईच्या कामांसाठी, स्नानगृहे धुण्यासाठी करण्याचे नियोजन होते. मात्र देखभालीअभावी हे दोन्ही प्रकल्प बंद झाले. ते पुन्हा सुरु करण्यासाठी कॅण्टोन्मेंट बोर्डने पावले उचललेली दिसत नाहीत.

धोबीघाटासमोर समुदाय भवन उभारण्यासाठी सुरुवात झाली. पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर दुसऱ्या मजल्याचे काम करताना निधीची कमतरता जाणवली. एसएफसी फंडातून निधी आल्यानंतर हे काम पूर्ण करण्याचे ठरले. सध्या इमारत बांधकाम अपूर्ण आहे. इमारतीच्या भिंतीला भेगा पडल्या असून या इमारतीत गैरप्रकार वाढले आहेत. कॅण्टोन्मेंट बोर्डाने ही रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी विशेष बैठक घ्यावी आणि प्रकल्प सुरू करावेत, अशी मागणी कॅम्प येथील रहिवासी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news