

बेळगाव : कर्ज काढून सुरू केलेला हॉटेल व्यवसाय चालत नसल्यामुळे व्यावसायिकाने जीवन संपवले आहे. रामचंद्र शंकर हळ्ळुरी (वय 65, रा. विणकर गल्ली, हुक्केरी) असे मृताचे नाव आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हुक्केरी पोलिसांनी याची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता, सदर वृद्धावर कर्ज असल्याने जीवन संपवल्याचे उघडकीस आले.
हळ्ळुरी यांनी हुक्केरी अर्बन बँक, महावीर को-ऑप. सोसायटी, बेल्लद बागेवाडी बँकेसह अन्य ठिकाणांहून कर्ज घेतले होते. कर्जाची ही रक्कम 11 लाखांपर्यंत होती. हुक्केरीतील जुन्या बसस्थानकाजवळ त्यांचे हनुमान हॉटेल आहे. ते व्यवस्थित चालत नसल्याने हे कर्ज कसे फेडायचे या विवंचणेत ते होते. यातूनच त्यांनी मंगळवारी पहाटे पाच ते सकाळी आठच्या सुमारास हॉटेलमध्येच गळफास घेतला.
सिलिंडर मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त व्हायरल झाले. ही बाब पोलिसप्रमुख के. रामराजन यांनी गांभीर्याने घेत हुक्केरीचे निरीक्षक महांतेश बसापुरे यांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याची सूचना केली. त्यांनी जाऊन पाहिले असता त्यांच्या हॉटेलमध्ये दोन भरलेले गॅस सिलिंडर होते. त्यांच्यावर कर्ज असल्याने आत्महत्या केल्याचे त्यांचा मुलगा उदय याने सांगितले. त्यानुसार याची हुक्केरी पोलिसांत नोंद झाली आहे.