Chaitanya Kulkarni inspirational story: तब्बल ३२ वर्षांनंतर अभियांत्रिकी पदवी

बांधकाम व्यावसायिक चैतन्य कुलकर्णी यांचे ५४ व्या वर्षी स्वप्न पूर्ण
Chaitanya Kulkarni inspirational story
Chaitanya KulkarniPudhari
Published on
Updated on

​बेळगाव : माणसाकडे प्रबळ इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर वय कधीच अडसर ठरत नाही, हे बेळगावमधील एका यशस्वी बांधकाम व्यावसायिकाने दाखवून दिले आहे. तरुण वयात सुटलेले शिक्षणाचे स्वप्न मनात जिवंत ठेवत, येथील चैतन्य कुलकर्णी यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. तब्बल ३२ वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर त्यांनी मिळवलेले हे यश तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

​चैतन्य कुलकर्णी यांनी १९९४ मध्ये बीएस्सी पूर्ण केल्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला होता. मात्र, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि घरच्या परिस्थितीमुळे त्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. शिक्षण थांबले तरी त्यांनी जिद्द हारली नाही. त्यांनी बांधकाम क्षेत्रात पाऊल ठेवत स्वतःची ओळख निर्माण केली आणि एक कुशल व यशस्वी व्यावसायिक म्हणून नावलौकिक मिळवला. अनेक गृहप्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले, तरीही आपल्याकडे या क्षेत्रातील अधिकृत पदवी असावी, ही इच्छा त्यांच्या मनात कायम होती.

​स्वतःचा बांधकाम व्यवसाय सांभाळत असतानाच त्यांनी पुन्हा एकदा शैक्षणिक प्रवासाला सुरुवात केली. 'विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी' (व्‍हीटीयु) शी संलग्न असलेल्या येथील 'अंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट' मधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

प्रत्येकाने आयुष्यात असेच ध्येय ठेवून काम केले पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. केवळ पदवी मिळवणे हा चैतन्य कुलकर्णी यांचा उद्देश नव्हता, तर परिस्थितीमुळे ज्यांचे शिक्षण अर्धवट राहिले आहे, अशा प्रत्येकाला "प्रयत्न सोडले नाहीत तर यश नक्की मिळते" हा विश्वास देणे हा यामागचा हेतू होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news