Karnataka Maharashtra Border Issue : सीमा भागात उद्या काळा दिन

विजय देवणेंसह सात नेत्यांना बेळगाव जिल्हाबंदी
Karnataka Maharashtra Border Issue : सीमा भागात उद्या काळा दिन
Published on: 
Updated on: 

बेळगाव : मराठी भाग कर्नाटकात समाविष्ट करण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून १ नोव्हेंबर रोजी सीमा भागात परंपरेप्रमाणे काळा दिन पाळण्यात येणार आहे. काळ्या दिनानिमित्त रविवारी (दि.१) मूक फेरी निघणार असून, जाहीर सभा होणार आहे. म. ए. समितीतर्फे त्यासाठी जागृती करण्यात येत असतानाच, या कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महाराष्ट्रातील सात नेत्यांना जिल्हाबंदी केली आहे.

शिवसेना (उबाठा) नेते विजय देवणे यांच्यासह संजय पोवार, सुनील शिंत्रे, सुनील मोदी, विशाल देवकुळे, मनजित माने यांच्यासह शिवसेना आणि म. ए. समिती नेत्यांवर जिल्हा प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. मराठी भाषिकांकडून पाळला जाणारा काळा दिवस आणि त्याच दिवशी होणाऱ्या कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी रोशन यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर प्रवेशबंदीचा आदेश जारी केला आहे.

राज्योत्सवदिनी महाराष्ट्रातील नेत्यांनी निपाणीमार्गे बेळगावात येऊन काळा दिवस पाळण्याचा इशारा दिल्याने संभाव्य तणाव टाळण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत जारी करण्यात आला आहे, असे आदेशात नमूद आहे. एकीकडे म. ए. समितीच्या काळ्या दिनाला तीनशे लोकही नसतात, असे खोट बोलणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता महाराष्ट्रातील नेत्यांना जिल्हाबंदी करून मराठी माणसांना दडपण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा मराठी भाषिकांतून निषेध करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.