

बेळगाव : बेळगावचा सीमाप्रश्र्न राम मंदिराच्या धर्तीवर सोडवावा, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र-कर्नाटक मंत्र्यांची समन्वय समिती स्थापन करून सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अत्याचार थांबवावेत, असे आवाहनही केले आहे. तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाचे स्मरण करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंगळवारी भेट घेण्याचा निर्णयही घेतला आहे.
मराठा मंदिरात शनिवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची आढावा बैठक झाली. मुंबईत सीमाप्रश्र्नी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांवर पुढील रणनीती आखण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते.
सहा वर्षांपासून प्रलंबित असलेली उच्चाधिकार समितीची बैठक व्हावी, यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती गेल्या दीड वर्षापासून सातत्याने प्रयत्नशील होती. ही बैठक अखेर गेल्या बुधवारी मुंबईत झाली असून, यामध्ये समितीच्या वतीने सीमाप्रश्नासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले, अशी माहिती मरगाळे यांनी दिली. मुंबईतील बैठकीत अनेक सकारात्मक विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
राममंदिराप्रमाणे सीमाभागातील ४० लाख मराठी जनतेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाची तातडीने आणि सलग सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. मागणीसाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अधिकृत अर्ज दाखल करावा, अशी विनंती समितीने केली आहे.
महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारला भाषिक अल्पसंख्याक हक्कांच्या अंमलबजावणीसंदर्भात पत्रव्यवहार करावा. गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र-कर्नाटकाचे प्रत्येकी तीन मंत्री व एक आयएएस अधिकारी यांची कमिटी करण्याची सूचना केली होती, त्याचा पाठपुरावा करावा व म. ए. समितीसोबत केंद्र सरकारने बैठक बोलावावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
मध्यवर्ती म. ए. समिती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार मालोजी अष्टेकर, रणजीत चव्हाण-पाटील, नेताजी जाधव, गोपाळ देसाई, शिवाजी खांडेकर, ॲड. महेश बिर्जे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला बी. डी. मोहनगेकर, ॲड. एम. जी. पाटील, एम. बी. गुरव, लक्ष्मण पाटील, अजित पाटील, गोपाळ पाटील, गोपाळ देसाई, पांडुरंग सावंत, रावजी पाटील, मनोहर हुंदरे, आबासाहेब देसाई, लक्ष्मण होनगेकर यांच्यासह समिती कार्यकर्ते उपस्थित होते.