Belgaum BLO suspended: कर्तव्यात कसूरप्रकरणी बीएलओ निलंबित

जिल्हाधिकार्‍यांची कारवाई : आदेशाच्या उल्लंघनाचा ठपका
Suspended
SuspendedPudhari
Published on
Updated on

बेळगाव : जिल्ह्यात मतदार यादी पडताळणीचे काम वेगाने सुरू असताना प्रक्रियेत निष्काळजीपणा आणि आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीएलओ शाहीना तहसीलदार यांना निलंबित केले आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निलंबनाचा आदेश बजावला. निलंबित बीएलओ केएसआरपी मच्छे येथील सरकारी कन्नड वरिष्ठ प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत.

२००२ सालातील मतदारांची २०२५ च्या अद्ययावत मतदार यादीत मॅपिंग प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेत १०० टक्के उद्दिष्टपूर्ती अपेक्षित असताना निलंबित बीएलओ यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या कार्यक्षेत्रात केवळ ४२.४५ टक्के इतकेच उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघात मॅपिंगचे काम योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप आमदार अभय पाटील यांनी महापालिकेत झालेल्या बैठकीत केला होता. यासंदर्भात तक्रार करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे आमदार पाटील यांनी केलेले आरोप खरे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कामासाठी प्रशासनाने व्यापक पातळीवर यंत्रणा उभी केली होती. वारंवार बैठका, व्हिडिओ कॉन्फरन्स, व्हॉटस् अॅप ग्रुपच्या माध्यमातून सूचना, रोज अहवाल, तसेच कमी प्रगती असलेल्या अधिकाऱ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन असे सर्व प्रयत्न केले. दर आठवड्याला गुगल मीटद्वारे पुनरावलोकन बैठका घेऊन काम गतिमान करण्याचे निर्देश दिले गेले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी या सर्व सूचनांकडे दुर्लक्ष केले. शाहीना तहसीलदार यांनी घराघरांत जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्याऐवजी कामात टाळाटाळ केली.

याशिवाय, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिलेल्या कारणे दाखवा नोटिसांना उत्तर दिले नाही. फोन कॉल न उचलणे, बैठकींना अनुपस्थित राहणे आणि अधिकृत संवाद टाळणे, या बाबी गंभीर शिस्तभंग म्हणून नोंदवल्या. प्रजासत्ताक प्रतिनिधित्व कायदा-१९५१ च्या कलम १३४ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली. पुढील चौकशी प्रलंबित ठेवत संबंधित अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्याचा आदेश दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news