

बेळगाव : जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची दडपशाही झुगारून हजारो युवकांनी काळ्यादिनी निषेध फेरीत सहभाग घेऊन मराठीचा झंझावात दाखवला. फेरीतून मराठी जनतेच्या लढ्याला नवचैतन्य आल्याचे दिसून आले. यातून कर्नाटकी दंडेलशाहीला सणसणीत चपराक बसली. बेळगाव, खानापूर, निपाणी, बिदर आदी सीमाभागात मराठी भाषिकांनी काळा दिन गांभीर्याने पाळत कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केला.
केंद्र सरकारने 1956 साली केलेल्या भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना अन्यायाने कर्नाटकात डांबले. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समिती 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळत आली आहे. म. ए. समितीने काळा दिन गांभीर्याने पाळून केंद्र सरकारने आपल्यावर केलेल्या अन्यायाचा निषेध केला. महाराष्ट्र एकीकरण समितीने पंधरा दिवसांपूर्वी 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून केंद्र सरकारला मराठी जनतेच्या भावना दर्शवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते; पण दरम्यानच्या काळात पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र एकीकरण समितीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यंदा काळ्या दिनाच्या फेरीला परवानगी देण्यात येणार नाही. काळा दिन पाळता येणार नाही, राज्योत्सव झाल्यानंतर काळा दिन पाळा, काळा दिन पाळल्यास कारवाई करू, असा इशारा शेवटच्या दिवसापर्यंत दिला; पण गेल्या 68 वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त करणार्या मराठी माणसाने प्रशासनाच्या धमकीला न जुमानता मोठ्या संख्येने फेरीत सहभागी होऊन फेरी यशस्वी करून दाखवली.
शुक्रवारी सकाळी सातपासूनच संभाजी उद्यान येथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मैदानातच शंभरभर पोलिस थांबून होते. अधिकारी पोलिसांना लाठ्या घेऊन या, चोख बंदोबस्त राखा, अशा माईकवरून सूचना करत होते. मराठी जनतेवर दबाव घालण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात येत होता; पण सकाळी 9 नंतर कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. साडेनऊ वाजता फेरीला सुरुवात झाली. या फेरीत लहान मुले, महिला, युवक आणि इतर कार्यकर्ते, नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धर्मवीर संभाजी उद्यान येथून फेरीला सुरुवात झाली. त्यानंतर तानाजी गल्ली रेल्वे गेट, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, हेमू कलानी चौक, ताशिलदार गल्ली, फुलबाग गल्ली, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाण पूल, एसपीएम रोड, शिवाजी उद्यान, गरगट्टी कारखाना, गाडे मार्ग, बसवाण गल्ली, विठ्ठलदेव गल्ली, सराफ गल्ली, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, मिरापूर गल्ली, खडे बाजार, बँक ऑफ इंडिया, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल या मार्गे मराठा मंदिरपर्यंत फेरी काढण्यात आली.
काळ्यादिनाच्या फेरीत संयुक्त महाराष्ट्राचा गजर करण्यात आला. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार झाला. कर्नाटकी अत्याचाराविरोधात, बेळगावच्या नामांतराविरोधात, मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भगवे आणि काळे ध्वज लोकांचे लक्ष वेधून घेत होते. तर विविध घोषणांचे फलकही दर्शवण्यात आले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते ठिकठिकाणी थांबून होते. युवावर्गाच्या मोठ्या सहभागामुळे संपूर्ण निषेध फेरीत चैतन्य निर्माण झाले होते.
या फेरीत मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण-पाटील, रमाकांत कोंडुसकर, आर. एम. चौगुले, आर. आय. पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, बी. ओ. येतोजी, महेश जुवेकर, दत्ता जाधव, राजू किणेकर, जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, माजी महापौर सरिता पाटील, रेणू किल्लेकर, मदन बामणे, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, विनोद आंबेवाडीकर, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, अॅड. एम. जी. पाटील, शुभम शेळके, श्रीकांत मांडेकर, संतोष कृष्णाचे, यल्लाप्पा रेमाण्णाचे, दुद्दाप्पा बागेवाडी, प्रकाश अष्टेकर, प्रदीप मुरकुटे, शिवराज पाटील, शिवाजी खांडेकर, अमित देसाई, विराज पाटील, अॅड. महेश बिर्जे, आर. के. पाटील, हणमंत मजुकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, प्रविण तेजम, गणेश दड्डीकर, सागर पाटील, अॅड. अमर यळ्ळूरकर, शिवानी पाटील, चंद्रकांत कोंडुसकर, नेताजी जाधव, विजय भोसले, किरण सायनाक, मल्लाप्पा गुरव, शांताराम गुरव आदी उपस्थित होते. या फेरीवर कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त जगदीश रोहन, एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पोलिसांचा बंदोबस्त होता.
सकाळी आठपासूनच संभाजी उद्यानात लोक एकत्रित.
माईकची परवानगी नसल्यामुळे फेरीत रिक्षा नव्हती.
महाराष्ट्रातील नेत्यांची फेरीकडे पाठ, लोकांत संताप
फेरीत मोठा पोलिस बंदोबस्त.
युवा वर्गाच्या सहभागामुळे फेरीत चैतन्य.
काळे कपडे, काळे आणि भगव्या ध्वज फेरीत मोठ्या प्रमाणात.
ग्रामीण भागातूनही युवकांचा मोठा सहभाग.
काळ्या दिनाच्या फेरीत संयुक्त महाराष्ट्राचा गजर करण्यात आला. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार झाला. कर्नाटकी अत्याचाराविरोधात, बेळगावच्या नामांतराविरोधात, मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भगवे आणि काळे ध्वज लोकांचे लक्ष वेधून घेत होते, तर विविध घोषणांचे फलकही दर्शवण्यात आले होते. युवावर्ग सातत्याने घोषणाबाजी करत असल्यामुळे संपूर्ण फेरीत युवा जोश दिसून आला.