Belgaum News : एंडोस्कोपीद्वारे काढले पोटातून नेलकटर

बिम्समधील घटना; डॉ. गणेश कोप्पद यांनी कौशल्य लावले पणाला
Belgaum News : एंडोस्कोपीद्वारे काढले पोटातून नेलकटर
Published on: 
Updated on: 

बेळगाव : बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (बिम्स) रुग्णालयातील डॉक्टरांनी एंडोस्कोपीद्वारे २० वर्षीय तरुणाच्या पोटात अडकलेले नेलकटर यशस्वीरीत्या बाहेर काढले. सुमारे आठवडाभरापूर्वी या तरुणाने नेलकटर गिळले होते. एक्स-रे तपासणीत पोटात वस्तू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर डॉक्टरांनी एंडोस्कोपीद्वारे ती बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. यशस्वी उपचारानंतर रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

ही प्रक्रिया वैद्यकीय गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. गणेश कोप्पद यांनी वरिष्ठ तंत्रज्ज्ञ दीपक केंगेरी यांच्या सहकार्याने केली. अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपीदरम्यान ‘रॅट-टूथ फोर्सेप्स’ या विशेष उपकरणाचा वापर करुन नेलकटर काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आले. नेलकटरसारख्या धारदार आणि अनियमित आकाराच्या वस्तू पचनसंस्थेतून बाहेर काढणे हे आव्हानात्मक काम असते. अशा वेळी अन्ननलिकेतील वरच्या व खालच्या स्फिंक्टरमधून वस्तू सुरक्षितपणे बाहेर काढताना विशेष दक्षता घ्यावी लागते. थोडीशी चूक झाल्यास अंतर्गत जखम, रक्तस्राव किंवा पचनसंस्थेला छिद्र पडण्यासारख्या गंभीर गुंतागुंती उद्भवू शकतात. त्यामुळे अशा उपचारांसाठी वैद्यकीय कौशल्य, अचूकता आणि योग्य उपकरणांचा वापर महत्त्वाचा ठरतो.

लहान मुलांकडून खेळताना किंवा कुतूहलापोटी नाणी, बॅटऱ्या, चुंबक, पिना, सुया आणि खेळण्यांचे छोटे भाग गिळले जाण्याची शक्यता असते. अशा वस्तूंमुळे पचनसंस्थेला इजा होणे, रक्तस्राव होणे किंवा आतड्यांना छिद्र पडणे यांसारखे गंभीर धोके निर्माण होऊ शकतात. विशेषतः बॅटरी, चुंबक आणि धारदार वस्तू गिळल्यास परिस्थिती अधिक धोकादायक ठरु शकते.

पालकांनी अशा वस्तू मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवाव्यात. एखाद्या व्यक्तीने वस्तू गिळल्याचा संशय आल्यास, लक्षणे दिसण्याची वाट न पाहता त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. स्वतःहून उलटी करवणे किंवा वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे टाळावे. बिम्स रुग्णालयातील या यशस्वी उपचारामुळे पचनसंस्थेत अडकलेल्या परकीय वस्तूंचे निदान आणि उपचारात्मक एंडोस्कोपीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news