Railway News : बंगळूर-मुंबई वंदे भारत स्लीपर १ नोव्हेंबरपासून?

प्रवास १६ तासांत : आठवड्यातून सहा दिवस धावण्याची शक्यता
Vande Bharat Sleeper Train
Vande Bharat Sleeper Trainfile photo
Published on: 
Updated on: 

बेळगाव : बहुप्रतीक्षित बंगळूर-मुंबई वंदे भारत स्लीपर रेल्वे सुरु होण्याची तारीख निश्चित झाल्याचे वृत्त असून कर्नाटक राज्योत्सवादिवशी १ नोव्हेंबर रोजी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात येण्याची शक्यता आहे. या रेल्वेचे नियमित संचालन २ नोव्हेंबरपासून सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत रेल्वे बोर्डाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर बंगळूरमधील सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनलपासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत धावणार आहे. तात्पुरत्या वेळापत्रकानुसार ही रेल्वे आठवड्यातून सहा दिवस धावण्याची शक्यता आहे. तात्पुरत्या वेळापत्रकानुसार बंगळूरहून रात्री ७.५० वाजता सुटणारी रेल्वे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मुंबईत पोचेल. या प्रवासासाठी १६ तास ५ मिनिटे लागण्याचा अंदाज आहे. तर मुंबईहून परतीची रेल्वे रात्री ८.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता बंगळूर स्थानकावर पोचणार आहे. या दिशेच्या प्रवासासाठी १५ तास ४५ मिनिटे लागण्याची शक्यता आहे.

सध्या बंगळूर ते मुंबई प्रवासासाठी साधारणतः २२ ते २४ तास लागतात. नवीन वंदे भारत स्लीपर रेल्वे सुरु झाल्यास प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः रात्रीचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी मुंबईत पोहोचू इच्छिणाऱ्या प्रवाशांना या सेवेमुळे फायदा होऊ शकतो. बंगळूर–मुंबई वंदे भारत स्लीपर रेल्वे गुंटकल मार्गावरून धावणार असल्याचे प्रस्तावित आहे. या मार्गावर अनंतपूर, गुंटकल, रायचूर, गुलबर्गा, सोलापूर, पुणे आणि कल्याण या सात स्थानकांवर थांबे देण्याची शक्यता आहे. या मार्गामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील रेल्वे संपर्क अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे. रायचूर, गुलबर्गा आणि सोलापूरसह मार्गावरील इतर शहरांतील प्रवाशांनाही या सेवेमुळे लाभ मिळू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news