Honeybee Attack : मधमाश्‍यांचा हल्ला; खबरदारीच रामबाण सल्ला

बेळगुंदीतील शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे मुद्दा ऐरणीवर; शेतात काम करताना काळजी घेण्याची गरज
Honeybee
HoneybeePudhari
Published on: 
Updated on: 

बेळगाव : सुगीच्या काळात शेतातील कामांना वेग येत असताना मधमाश्‍यांच्या हल्ल्यांचा धोका वाढला आहे. शेतातील झाडे, बांध, झुडपे तसेच पिकांमध्ये मधमाशांची पोळी आढळून येत असल्याने शेतकरी, महिला व शेतमजुरांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. बेळगुंदी येथे मधमाश्‍यांच्या हल्ल्यात अजित पाटील या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शेतात काम करताना अचानक मधमाश्‍यांचे पोळे आढळल्यास त्याला हात लावणे, दगड मारणे किंवा काठीने छेडणे टाळावे. अनेकदा पक्षी, माकड किंवा अन्य प्राणी पोळ्याला धक्का देतात आणि त्यानंतर मधमाश्‍या परिसरातील व्यक्तींवर हल्ला करतात. अशावेळी मधमाश्‍या जवळ आल्यास हातवारे करुन त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करणे टाळावे. शक्य असल्यास चेहरा व डोके कपड्याने झाकून शांतपणे सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा. धावून जाण्यापेक्षा इमारत, वाहन किंवा बंदिस्त जागेचा आश्रय घेणे अधिक सुरक्षित ठरते.

मधमाश्‍यांनी दंश केल्यास त्वचेवर रुतलेला काटा दिसत असल्यास तो शक्य तितक्या लवकर काढावा. दंश झालेल्या जागेवर थंड पाण्याची पट्टी ठेवावी. मोठ्या प्रमाणात दंश झाले असतील किंवा चेहरा, तोंड, घसा याठिकाणी दंश झाला असेल तर विलंब न करता वैद्यकीय मदत घ्यावी.

मधमाश्‍यांचा दंश हा केवळ किरकोळ दुखापत समजून दुर्लक्ष करण्यासारखा नसून काही वेळा जीवघेण्या ॲलर्जीला कारणीभूत ठरु शकतो. मधमाश्‍यांच्या दंशानंतर काही व्यक्तींना तीव्र ॲलर्जी होऊ शकते. श्वास घेण्यास त्रास होणे, ओठ किंवा जीभ सुजणे, चक्कर येणे, उलट्या होणे, अंगावर मोठ्या प्रमाणात पुरळ येणे किंवा बेशुद्धावस्था अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात दंश झालेल्या व्यक्तीलाही तातडीने वैद्यकीय तपासणीची गरज असते.

शेतकरी, महिला सुगीच्या काळात मधमाश्‍यांच्या हल्ल्यापासून विशेष सावधानता बाळगणे गरजेचे आहे. सुगीच्या काळात शेतकरी दिवसभर शेतात काम करतात. त्यामुळे काम सुरू करण्यापूर्वी परिसराची पाहणी करुन झाडांवर, झुडपांमध्ये किंवा बांधावर मधमाश्‍यांचे पोळे आहे का, याची खात्री करावी. मधमाश्‍यांचे पोळे दिसल्यास त्यापासून दूर राहावे आणि इतर शेतकऱ्यांनाही त्याची माहिती द्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news