

बेळगाव : लेबरकार्ड देण्याचे आमिष दाखवत आपली कागदपत्रे व मोबाईल घेऊन आपल्या नावे बँक खाते उघडले. दोन बँकांमध्ये आपली खाती उघडून या खात्यांवरून २ लाख ६० हजार रुपयांची रक्कम वर्ग करून घेत गैरवापर केला असल्याची फिर्याद एकाने शहर सीईएन विभागात दिली आहे. त्यानुसार सादिक असिफ इनामदार (रा. वैभवनगर, बेळगाव) याच्याविरोधात मंगळवारी (दि. २१) गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्याददार निंगाप्पा इराप्पा सावंत (रा. ज्ञानेश्वरनगर, बेकिनकेरे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपली व सादिक याची दहा वर्षांपासून ओळख असून एकत्रित काम करतो. यंदा मार्च महिन्यात सादिकने तुला लेबर कार्ड करून देतो, असे सांगून आपला मोबाईल व आधारकार्ड घेऊन गेला. त्या दिवशी सायंकाळी दोन्हीही परत आणून दिला.
परंतु, यानंतर पुन्हा आपले आधारकार्ड अपडेट करायचे आहे, असे सांगून सुमारे २५ ते ३० वेळा घेऊन गेला. यानंतर त्याने आपल्याला माहिती नसताना आपल्या नावे एसबीआय व केव्हीजी बँकेत खाते उघडले. यापैकी एसबीआय बँकेच्या खात्यावरून २ लाख २६ हजार ५८४ रुपये तर केव्हीजी बँक खात्यावरून ३४ हजारांची रक्कम परस्पर वर्ग करून घेतली.
आपल्याला अंधारात ठेवून बँक खाते उघडण्याबरोबरच त्यावर व्यवहार करत आपली फसवणूक केल्याची फिर्याद निंगाप्पाने दिली आहे. त्यानुसार सीईएन पोलिसांनी सादिकविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलिस निरीक्षक श्रीशैल गाबी पुढील तपास करीत आहेत.