

संकेश्वर : उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी सरकार दूरदृष्टीच्या योजनांची अंमलबजावणी करत नसल्याबद्दल माजी खासदार रमेश कत्ती यांनी खंत व्यक्त केली आहे. तसेच जिल्ह्याचे त्रिभाजन न झाल्यामुळे विकास रखडला आहे, अशी टीका करताना त्यांनी न्यायाधीशांची समिती नेमून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन मार्गी लावावे, अशी मागणी केली.
आगामी हिवाळी अधिवेशनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कत्ती म्हणाले, बेळगाव सुवर्णसौधमध्ये होणारे अधिवेशन म्हणजे सणासुदीच्या काळात भिकाऱ्याच्या घरी होणाऱ्या मेजवानीसारखेच आहे. आजपर्यंत झालेली अधिवेशने पाहता या प्रदेशात काय कामे झाली आहेत हे लोकांना कळायला हवे? अधिकारी व लोकप्रतिनिधींनी याचे उत्तर दिले पाहिजे. तसेच उत्तर कर्नाटक लोकप्रतिनिधींनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या भागाच्या विकासासाठी एकजुटीने संघर्ष करून आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या पाहिजेत.
कत्ती पुढे म्हणाले, राज्यातील दुष्काळामुळे पिकांचे नुकसान, पिण्याचे पाणी, चारा, बेरोजगारी वाढल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जे पूर्णपणे माफ करून सरकारने त्यांच्या संरक्षणासाठी पुढे यावे. राज्यातील ऊस उत्पादकांनी ऐतिहासिक लढा दिला आहे.