

बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी (दि. १९) हुबळी आणि एकसंबा दौऱ्यावर आहेत. केएलई आणि बिरेश्वर संस्थांच्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.
मंत्री शहा सकाळी ११ वाजता हुबळी येथील केएलई संस्थेच्या जेजीएमएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे उद्घाटन करणार आहेत. सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत ते या कार्यक्रमात सहभागी होतील. कार्यक्रमासाठी मोठा शामियाना उभारण्यात आला असून केएलई संस्थेचे मानद कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होणार आहे.
मंत्री शहा दुपारी १.५५ वाजता हुबळी विमानतळावरून विशेष विमानाने कोल्हापूरकडे रवाना होतील. दुपारी २.३० वाजता छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर येथे त्यांचे आगमन होईल. तेथून दुपारी २.५० वाजता हेलिकॉप्टरने ते एकसंबा येथे दाखल होणार आहेत. दुपारी ३ वाजता ते बिरेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते पुन्हा कोल्हापूरला रवाना होतील.